
नांदेड जिल्ह्यातील धर्माबाद आणि मुखेड नगर परिषदेच्या निवडणुकीसाठी शनिवारी मतदान होणार आहे. सोबतच कुंडलवाडी, भोकर आणि लोहा येथील प्रत्येकी एका प्रभागाची निवडणूक देखील होणार आहे.
मागच्या महिन्यात धर्माबाद आणि मुखेड येथील नगरपालिकेच्या निवडणुकीला निवडणूक आयोगाने स्थगिती दिली व उमेदवारी अर्ज मागे घेण्याची मुदत वाढवली. तसेच कुंडलवाडी (३ अ), भोकर-(१-ब), लोहा -(५- ब) येथील वार्डाची निवडणूक प्रक्रियाही न्यायालयातील याचिकामुळे पुढे ढकलण्यात आली होती. आता ही निवडणूक 20 डिसेंबर रोजी होणार असून, या निवडणुकीच्या प्रक्रियेसाठी सर्व प्रशासकीय तयारी पूर्ण झाली आहे.
धर्माबाद येथे अध्यक्ष पदासाठी नऊ व ११ प्रभागातून २२ सदस्यांसाठी १२५ उमेदवार तर मुखेड येथे अध्यक्ष पदासाठी ३ उमेदवार आणि १० प्रभागातील २० नगरसेवक निवडून देण्यासाठी ५७ उमेदवार रिंगणात आहेत. तर कुंडलवाडी प्रभाग ३-अ येथे निवडणूक होणार आहे. त्यासाठी पाच उमेदवार, भोकर येथे १-ब या जागेसाठी सहा उमेदवार तर लोहा येथे ५-ब या जागेसाठी पाच उमेदवार रिंगणात आहेत, असे एकूण २१० उमेदवार उद्याच्या निवडणुकीच्या रिंगणात आहेत. या निवडणुकीसाठी धर्माबाद येथे ३३, मुखेड येथे २७, कुंडलवाडी येथे २, भोकर येथे २, लोहा येथे ३ अशी ६७ मतदान केंद्रे तैनात करण्यात आली आहेत. यासाठी ३१७ कर्मचारी व अधिकारी निवडणूक प्रक्रिया पार पाडणार आहेत.
धर्माबाद येथे २७ हजार २५६ तर मुखेड येथे २५ हजार ६५६ मतदार मतदानासाठी पात्र आहेत. तर कुंडलवाडी येथील एका प्रभागासाठी होणार्या निवडणुकीत ११५१, भोकर येथे १८९० तर लोहा येथे २ हजार ६३६ मतदार आहेत. एकूण ५८ हजार ५८९ मतदार मतदानासाठी पात्र आहेत. शनिवारी सकाळी साडेसात ते साडेपाच या काळात मतदान होणार असून, पोलीस यंत्रणा यासाठी सज्ज करण्यात आली आहे.




























































