
महाभारत मालिकेतील युधिष्ठीरची भूमिका करणारे अभिनेता गजेंद्र चौहान यांना सायबर भामटय़ांनी गंडा घातला. फेसबुकवर स्वस्तातील ड्रायफ्रुटची जाहिरात पाहून चौहान फसले आणि त्यांचे 98 हजार आरोपींनी वळते केले. ओशिवरा पोलीस ठाण्यात वेळीच त्यांनी तक्रार दिल्याने पोलिसांनी लगेच हालचाल करून गोल्डन अवरमध्ये चौहान यांचे सर्व पैसे परत मिळवून दिले.
गजेंद्र चौहान यांनी फेसबुकवर डी मार्टची स्वस्तातील ड्रायप्रूटची जाहिरात पाहून त्यावर त्यांनी क्लिक केले असता त्यांना एक ओटीपी आला. तो ओटीपी ऑर्डर घेण्यासाठी त्यांनी तेथे टाकला असता त्यांच्या एचडीएफसी बँकेच्या खात्यातून 98 हजार रुपये वळते झाल्याचा संदेश त्यांना प्राप्त झाला. आपली आर्थिक फसवणूक झाल्याचे लक्षात येताच त्यांनी लगेच ओशिवरा पोलीस ठाणे गाठून तक्रार दिली. वरिष्ठ निरीक्षक संजय चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक शरद देवरे तसेच अशोक काsंडे आणि विक्रम सरनोबत यांनी तत्काळ तपास सुरू केला.





























































