
नॅशनल सिक्युरिटी ऍक्टच्या गुह्यात वृद्ध महिलेला अटकेची भीती दाखवून फसवणूक करणाऱयाला उत्तर प्रादेशिक सायबर पोलिसांनी अटक केली. सुनील शिरोडकर असे त्याचे नाव आहे. त्याने स्वतःच्या नावाच्या कंपनीचे खाते उघडले होते. त्या खात्यात फसवणुकीची रक्कम जमा झाली होती. त्याला अटक करून न्यायालयात हजर केले होते.
तक्रारदार महिला मालाड येथे राहत असून त्यांना फोनवर नाशिकच्या पंचवटी पोलीस ठाण्यात पोलीस अधिकारी असल्याचे भासवले. त्याच्या आधारकार्डचा गैरवापर केल्याचे सांगितले. तस्करीमार्गे आणलेले सोने आणि क्रूड ऑईल विक्री करून त्यातून दोन कोटींचा घोटाळा केला. त्यामुळे त्याच्या विरोधात नॅशनल सिक्युरीटी ऍक्टनुसार गुन्हा दाखल केला आहे. त्या गुह्यात अटक केली जाणार असल्याची भीती दाखवली. विश्वास बसावा म्हणून त्याने व्हिडीओ कॉल करून शासकीय मुद्रा, शिक्के असलेले अटक वॉरंट दाखवले. तिच्या प्रत्येक हालचालीवर लक्ष असून चौकशी होईपर्यंत कोणाशी संपर्क करू नये. त्यानंतर ठगाने बँक खात्याची माहिती घेतली.
ती खाती सील होणार अशी भीती दाखवली. चौकशी झाल्यावर ती रक्कम खात्यात ट्रान्स्फर होईल. त्यावर विश्वास ठेवून महिलेने 25 लाख रुपये खात्यात ट्रान्स्फर केले. फसवणूक झाल्याचे लक्षात येताच त्याने उत्तर प्रादेशिक सायबर पोलीस ठाण्यात धाव घेतली. प्रभारी पोलीस निरीक्षक किरण आहेर यांच्या पथकातील पोलीस निरीक्षक राहुल खेत्रे, संदीप पंचागणे, रवींद्र पाटील, नागौडा, शिंदे आदींच्या पथकाने तपास करून आरोपीला अटक केली.
ऑफिसमध्ये चोरी करणाऱया कर्मचाऱयाला अटक
खासगी कार्यालयात चोरीप्रकरणी ऑफिस बॉयला बोरिवली पोलिसांनी अटक केली. मोनूकुमार ठाकूर असे त्याचे नाव आहे. तक्रारदार हे व्यावसायिक असून ते बोरिवली येथे राहतात. त्याची एक खासगी कंपनी आहे. त्या कंपनीत एकूण 30 कामगार काम करतात. तीन दिवसांपूर्वी त्याच्या कार्यालयातून एक लॅपटॉप चोरीला गेला होता. हा प्रकार संशयास्पद वाटल्याने तक्रारदार याने कार्यालयातील सीसीटीव्ही फुटेजची तपासणी केली. एका फुटेजमध्ये मोनू हा लॅपटॉप चोरून स्टोअररूममध्ये ठेवत असल्याचे दिसले. त्याचदरम्यान त्याच्या कार्यालयात काही ऐवज चोरीला गेल्याचे त्याच्या लक्षात आले. घडल्याप्रकरणी त्याने बोरिवली पोलीस ठाण्यात धाव घेतली. पोलिसांनी तपास सुरू करून मोनूकुमारला अटक केली.
डीपफेक व्हिडीओप्रकरणी गुन्हा नोंद
प्रसिद्ध कंटेंट क्रिएटर महिलेचा डीपफेक व्हिडीओ प्रकरणाची महाराष्ट्र सायबरने गंभीर दखल घेतली आहे. डीपफेक व्हिडीओप्रकरणी महाराष्ट्र सायबरने गुन्हा नोंद केला आहे. तक्रारदार या प्रसिद्ध यूटय़ूबर आहेत. त्यांचा एक डीपफेक व्हिडीओ नुकताच व्हायरल झाला होता. ऑनलाइन प्लॅटफॉर्मवर तो व्हिडीओ अपलोड झाला होता. त्या व्हिडीओमध्ये खोटय़ा पद्धतीने त्याच्याशी असल्याचा दावा केला जात होता. त्या व्हिडीओमुळे महिलेची बदनामी झाली. या प्रकरणी त्यांनी महाराष्ट्र सायबरकडे धाव घेत तक्रार दाखल केली.



























































