
संसदेच्या हिवाळी अधिवेशनाचे आज सूप वाजले. ‘वंदे मातरम्’, ‘एसआयआर’ यासारख्या मुद्द्य़ांवर या अधिवेशनात जोरदार चर्चा झाली. त्यानंतर ‘मनरेगा’ऐवजी ‘जी राम जी’ या नव्या योजनेवरून झालेल्या विरोधाने अधिवेशनाची सांगता झाली. लोकसभेत 111 टक्के इतके तर राज्यसभेत 121 टक्के इतके कामकाज झाले. दोन्ही सभागृहांच्या प्रत्येकी पंधरा बैठका झाल्या. पुढील अर्थसंकल्पीय अधिवेशन जानेवारीअखेर होईल.
लोकसभेत आज कामकाजाला सुरुवात होताच अध्यक्ष ओम बिर्ला यांनी संसदेचे हिवाळी अधिवेशन अनिश्चित काळासाठी संस्थगित होत असल्याची घोषणा केली. हे अधिवेशन फलदायी झाल्याचे त्यांनी आवर्जून नमूद केले. तसेच या अधिवेशनात मंजूर झालेल्या ‘व्ही. बी. जी राम जी’ विधेयकासह इतर विधेयकांची उजळणी केली. राज्यसभेतही सभापती राधाकृष्णन यांनी संसदेच्या हिवाळी अधिवेशनाच्या समाप्तीची घोषणा केली. हिवाळी अधिवेशनाला 1 डिसेंबर रोजी सुरुवात झाली. अधिवेशनाच्या सुरुवातीलाच निवडणूक आयोगाने हाती घेतलेल्या मतदार यादी सुधारणेवर (एसआयआर) संसदेत चर्चा झाली पाहिजे यासाठी विरोधकांनी प्रचंड गदारोळ केला. पहिल्या आठवडय़ात विरोधकांनी कामकाज ठप्प पाडल्यानंतर सरकारने अखेर नमते घेत ‘एसआयआर’वर चर्चेसाठी 10 तासांचा वेळ राखून ठेवला. ही चर्च वादळी ठरली. त्यापूर्वी ‘वंदे मातरम्’ गीताला 150 वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त एक दिवस विशेष चर्चा ठेवण्यात आली होती. त्यातही सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जोरदार खडाजंगी पाहायला मिळली.
‘जी राम जी’विरुद्ध तृणमूलचे रात्रभर आंदोलन
मनरेगाचे नाव बदलून ‘व्ही. बी. जी राम जी’ नावाने नवा कायदा करण्याच्या केंद्र सरकारच्या धोरणाविरोधात तृणमूल काँग्रेसने आक्रमक भूमिका घेतली. तृणमूलच्या खासदारांनी संसद भवनात गुरुवारपासून रात्रभर ठाण मांडून या कायद्याचा निषेध केला. तृणमूलच्या सदस्यांनी ‘हम होंगे कामयाब’ यासारखी गाणी गाऊन मनोबल उंचावण्याचा प्रयत्न केला. यावेळी खासदारांच्या हातात महात्मा गांधी आणि रवींद्रनाथ टागोर यांची छायाचित्रे आणि पोस्टर्स होते.
अखरेच्या दोन दिवसांत 4-5 विधेयके…
प्रियंका गांधींची नाराजी
काँग्रेसच्या खासदार प्रियंका गांधी यांनी मोदी सरकारच्या कार्यपद्धतीवर तीव्र नाराजी व्यक्त केली. अधिवेशन बऱयाच दिवसांपासून सुरू आहे, पण तुम्ही शेवटच्या काही दिवसांमध्ये अचानक ‘जी राम जी’सारखी काही विधेयके आणता. त्यावर चर्चा करण्यासाठी खूप कमी वेळ ठेवता. घाईघाईने ही विधेयके मंजूर केली जातात. हे संशयास्पद आहे. प्रदूषणावरही चर्चा झाली पाहिजे, असे प्रियंका गांधी म्हणाल्या.
सुरुवात आणि अखेर अपमानानेच; काँग्रेसचा आरोप
अधिवेशनाची सुरुवात रवींद्रनाथ टागोर यांच्या अपमानाने झाली आणि महात्मा गांधी यांच्या अपमानानेच अखेर झाली, असा आरोप काँग्रेसचे खासदार जयराम रमेश यांनी केला. ‘वंदे मातरम्’वरील चर्चेतून पंडित नेहरू यांना बदनाम करणे आणि इतिहास चुकीच्या पद्धतीने मांडण्यावर सरकारचा भर होता, तर ‘जी राम जी’ विधेयक आणून सरकारने महात्मा गांधींचा अपमान केला आहे, असे रमेश म्हणाले.
8 विधेयके मंजूर
हिवाळी अधिवेशनात एकूण 12 विधेयके मांडण्यात आली. त्यापैकी 8 विधेयकांना मंजुरी मिळाली, तर दोन विधेयके संसदीय समितीकडे पाठविण्यात आली. मंजूर झालेल्या विधेयकांमध्ये मनरेगाची जागा घेणारे ‘जी राम जी’ विधेयक, अणुऊर्जेबाबतचे शांती विधेयक, विमा कायदा सुधारणा, जुने कायदे रद्द करणारे विधेयक, मणिपूर जीएसटी सुधारणा विधेयक, केंद्रीय उत्पादन शुल्क सुधारणा विधेयक, आरोग्य सुरक्षा उपकर विधेयक तसेच पुरवणी मागण्या अशी 8 विधेयके मंजूर झाली.




























































