
सातारा ड्रग्ज प्रकरणात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे किंवा त्यांच्या कुटुंबीयांचा कोणताही सहभाग नाही. पोलिसांनी आजवर केलेल्या तपासात कोणताही पुरावा आढळून आलेला नाही. या प्रकरणात होणारे आरोप चुकीचे आहेत, असे सांगत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शिंदे यांची पाठराखण केली.
सातारा ड्रग्जप्रकरणी सर्वप्रथम मी पोलीस विभागाचे अभिनंदन करतो. त्यांनी त्या ठिकाणी सुरू असलेल्या धंद्याचा पर्दाफाश केला. त्यांच्यावर मोठी कारवाई केली. या संपूर्ण प्रकरणात जाणीवपूर्वक राजकीयदृष्टय़ा कुठेतरी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे नाव आणण्याचा प्रयत्न सुरू आहे. या प्रकरणात आतापर्यंत हाती लागलेल्या पुराव्यांमध्ये त्यांचा किंवा त्यांच्या कुटुंबातील कोणताही संबंध दुरान्वयेही आला नाही. त्यामुळे मला असे वाटते की, कुठेतरी दिशाभूल करून अशा पद्धतीने संबंध जोडणे योग्य नाही. यासंदर्भात सरकार पूर्ण चौकशी करत असल्याचे फडणवीस म्हणाले.
मुख्यमंत्री तपास अधिकारी झालेत का? – अंबादास दानवे
या प्रकरणात उपमुख्यमंत्री शिंदेंच्या भावाचा समावेश असल्याचे पुरावे समोर आले आहेत. असे असताना दुरान्वयेही संबंध नाही असे मुख्यमंत्री कसे काय म्हणू शकतात? ड्रग्ज आढळले त्या ठिकाणी सातारा पोलीस पोहोचत नाहीत, थेट मुंबई पोलीस पोहोचतात याचा अर्थ काय घ्यायचा? मुख्यमंत्री कोणत्याही तपासाशिवाय क्लीन चिट देत आहेत. मुख्यमंत्री तपास अधिकारी झाले की काय, असा संतप्त सवाल विधान परिषदेचे माजी विरोधी पक्षनेते अंबादास दानवे केला आहे.



























































