
नगर परिषदा आणि नगर पंचायतींच्या निवडणुकीत नांदेडातील किनवट, बुलढाण्यातील मेहकर, जळगावातील धरणगाव व यावल तसेच छत्रपती संभाजीनगरातील फुलंब्री या नगर परिषदांमध्ये शिवसेना पक्षाची मशाल पेटली. सत्ता काबीज करण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी धावाधाव करून घेतलेल्या सभा वांझोटय़ा ठरल्याने भाजपचे मनसुबे उधळून गेले आहेत.
नांदेड जिल्हय़ातील बारा नगर परिषदा व एका नगर पंचायतीच्या निवडणुकांचे निकाल लागले असून त्यात शिवसेना पक्षाला किनवटला पहिल्यांदा नगराध्यक्ष पद प्राप्त झाले आहे. जिल्हय़ातील नगरसेवकांचे पक्षनिहाय बलाबल पुढीलप्रमाणे असून शिवसेना पक्षाने 14 ठिकाणी गुलाल उधळला आहे. जिह्यात राष्ट्रवादी काँग्रेस-71, भाजप-67, काँग्रेस-42, शिवसेना मिंधे गट-15, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार-6, एमआयएम-2, वंचित बहुजन आघाडी-1, मराठवाडा जनहित पार्टी-33, अपक्ष-6 असे पक्षीय बलाबल आहे.
बुलढाणा जिह्यातील मेहकर नगर परिषद निवडणुकीत शिवसेना पक्षाचे शिवसेना शहरप्रमुख किशोर भास्करराव गारोळे हे 1,237 मतांनी विजयी झाल्याने नगर परिषदेवर शिवसेनेचा भगवा फडकला आहे. जिह्यात बहुतांश ठिकाणी शिवसेना उमेदवारांनी मिंधे गटाला धोबीपछाड दिला. 26 नगरसेवकांपैकी शिवसेना पक्षाला 6, काँग्रेस 11 व मिंधे गटाला 9 जागा मिळाल्या आहेत. नगराध्यक्ष पदासाठी शिवसेना उमेदवार किशोर भास्करराव गारोळे यांना 10 हजार 239, तर त्यांचे प्रतिस्पर्धी काँग्रेसचे माजी नगराध्यक्ष कासम पिरू गवळी यांना 9002 मते मिळाली.
फुलंब्री नगर पंचायत निवडणुकीत मतदारांनी स्पष्ट काwल देत भाजपची दीर्घकाळची सत्ता उलथवून टाकली आहे. महाविकास आघाडीचे उमेदवार राजेंद्र ठोंबरे यांनी भाजपाचे जिल्हाध्यक्ष व माजी नगराध्यक्ष सुहास शिरसाठ यांचा 1,797 मतांनी दारुण पराभव करत नगराध्यक्ष पदावर नाव कोरले आहे.
मराठवाडय़ातील पक्षीय बलाबल
मराठवाडय़ातील 52पैकी 40 ठिकाणी महायुतीचे उमेदवार विजयी झाले, तर 8 ठिकाणी महाविकास आघाडीच्या उमेदवारांनी बाजी मारली. इतरांना 4 ठिकाणी खाते उघडता आले. यामध्ये शिवसेना – 2, भाजप – 18, मिंधे गट – 11, अजित पवार गट – 11, शरद पवार गट – 2, काँग्रेस – 8 आणि यशवंत सेना, रासप व मराठवाडा जनहित पार्टीच्या 2 नगराध्यक्षांचा समावेश आहे.
धरणगाव- शिवसेनेच्या विजयी उमेदवार लीलाबाई चौधरी यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास अभिवादन केले. सोबत शिवसेना उपनेते गुलाबराव वाघ, युवासेनेचे जिल्हाधिकारी नीलेश चौधरी आदी.
शिवसेनेने शिंदे गटाचा उडवला धुव्वा
जळगाव जिह्यातील निवडणुकांमध्ये शिवसेना पक्षाच्या उमेदवारांनी दणदणीत विजय मिळवल्याने मिंधे गटाचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांना धक्का बसला आहे. धरणगावात शिवसेना पक्षाच्या लीलाबाई चौधरी यांनी मिंधे गटाच्या उमेदवाराचा दारुण पराभव केला. तर यावल नगर परिषदेच्या निवडणुकीत शिवसेना पक्षाच्या छाया पाटील यांनी बाजी मारली. भुसावळ शहरात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या (शरदचंद्र पवार) गायत्री भंगाळे-गौर यांनी भाजपचे मंत्री संजय सावकारे यांच्या पत्नी रजनी सावकारे यांचा दारुण पराभव केला.

























































