
छत्तीसगड जिल्ह्यातील एका खाजगी विद्यापीठात कॉम्प्युटर सायन्स अभियांत्रिकीच्या दुसऱ्या वर्षात शिकणाऱ्या 20 वर्षीय विद्यार्थिनीने टोकाचे पाऊल उचलले. शनिवारी रात्री वसतिगृहातील आपल्या खोलीत गळफास घेऊन आत्महत्या केली. प्रिन्सी कुमारी असे या मृत विद्यार्थिनीचे नाव असून ती मूळची झारखंडमधील जमशेदपूरची रहिवासी होती. या घटनेची माहिती मिळताच परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रिन्सी गेल्या अनेक दिवसांपासून शैक्षणिक ताणावात होती. दुसऱ्या वर्षाच्या परीक्षांसोबतच तिला पहिल्या वर्षातील पाच विषयांचे ‘बॅकलॉग’ पेपर्सही द्यायचे होते. अभ्यासाचा ताण अधिक असल्याने तिने हे पाऊल उचलले. दरम्यान शनिवारी रात्री साडे आठच्या सुमारास तिच्या पालकांनी तिला वारंवार फोन केले. मात्र तिने एकही फोन उचलल नाही. काळजीपोटी पालकांनी वसतिगृहातील स्टाफसोबत संपर्क साधला. यानंतर स्टाफने खोलीवर जाऊन पाहिले असता दरवाजा आतून बंद होता. खिडकीतून डोकावले असता प्रिन्सी गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळली.
वसतिगृहाच्या स्टाफने याबाबत तातडीने पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनी घटनास्थळी येताच तातडीने तपास सुरू केला असता, त्यांना घटनास्थळावर एक सुसाईड नोट सापडली. यात तिने आपल्या पालकांची माफी मागितली होती. “सॉरी मम्मी-पापा, मी तुमच्या अपेक्षा पूर्ण करू शकले नाही,” असे तिने लिहिले होते. प्रिन्सी कुमारीच्या कुटुंबाने दिलेल्या माहितीनुसार, प्रिन्सीने अलीकडेच फीसाठी 1 लाख रुपयांची मागणीही केली होती.
दरम्यान पोलिसांनी याप्रकरणी अकस्मात मृत्यूची नोंद केली असून मृतदेह शवविच्छेदनानंतर नातेवाईकांच्या स्वाधीन केला आहे. वसतिगृहातील इतर विद्यार्थी आणि विद्यापीठ कर्मचाऱ्यांचे जबाब नोंदवण्यात येत आहेत. या घटनेमुळे विद्यापीठ परिसरात मोठी हळहळ व्यक्त केली जात आहे.

























































