
प्रसिद्ध अमेरिकन अभिनेते जेम्स रॅन्सोन यांचे वयाच्या 46 व्या वर्षी निधन झाले. लॉस एंजेलिस काउंटी मेडिकल एक्झामिनर यांनी या बातमीची पुष्टी दिलेली आहे. त्यांचा मृत्यू हा नैसर्गिक नसून आत्महत्या असल्याचे म्हटले जात आहे. त्यांनी केलेल्या आत्महत्येमुळे चित्रपट आणि टेलिव्हिजन जगताला धक्का बसला आहे.
एचबीओच्या आयकॉनिक क्राइम ड्रामा ‘द वायर’ (The Wire) मध्ये जेम्स रॅन्सोन चेस्टर झिगी सोबोटकाच्या भूमिकेसाठी प्रसिद्ध होते. या ड्रामाच्या दुसऱ्या सीझनमध्ये त्यांनी गुन्हेगारीच्या जगात अडकलेल्या एका गोदी कामगाराची भूमिका वठवली होती. या भूमिकेचे कौतुक समीक्षकांकडून मोठ्या प्रमाणात झाले होते. जेम्स रॅन्सोन द वायर मधील त्यांच्या भूमिकेमुळे सर्वांच्याच गळ्यातील ताईत बनले होते.
एचबीओच्या ‘जनरेशन किल’ या लघु मालिकेत कॉर्पोरल जोश रे पर्सनची भूमिका केली होती. तिथे त्यांनी अलेक्झांडर स्कार्सगार्ड सारख्या कलाकारांसोबत काम केले होते. 1979 मध्ये बाल्टिमोर येथे जेम्स रॅन्सोन यांचा जन्म झाला होता. जन्मलेल्या जेम्स रॅन्सोन यांनी मेरीलँडमधील कार्व्हर सेंटर फॉर आर्ट्स अँड टेक्नॉलॉजीमध्ये शिक्षण घेतले होते. 2002 मध्ये त्यांना केन पार्क या चित्रपटात पहिली मोठी संधी मिळाली. त्यानंतर त्यांनी कधीही मागे वळून पाहिले नाही. त्यांचे वैयक्तिक जीवन हे फार संघर्षमय होते.



















































