
मिंधे म्हणतात, ‘‘आता माझीच शिवसेना खरी!’’ काय खरे आणि काय खोटे, हे राज्यातील सामान्य जनता ओळखून आहे. ज्यांनी आपला विजय मोदी-शहांच्या चरणी अर्पण केला त्या चोरांच्या तोंडी ‘शिवसेना’ हे पवित्र नाव शोभत नाही. याच मोदी-शहांनी धनुष्यबाण चोरला आणि महाराष्ट्रातील अट्टल बेइमानांच्या हाती सोपवला. आता हे अट्टल म्हणत आहेत की, ‘‘आम्हीच खरे!’’ लोकसभा, विधानसभा व नगरपालिका असा चोरीचा ‘इजा, बिजा, तिजा’ झाला आहे. यापुढचे चित्र वेगळे असेल याविषयी आमच्या मनात शंका नाही.
खरी शिवसेना जनतेने दाखवून दिल्याची मुक्ताफळे एकनाथ शिंदे यांनी उधळली आहेत. ही वायफळ मुक्ताफळे आहेत. लोकसभा, विधानसभा व आता नगरपालिका निवडणुकांतही आमच्या पक्षाने भक्कम कामगिरी केल्याचा शिंदे यांचा दावा पोकळ आहे. मुळात अमित शहा यांच्या दबावाने ‘शिवसेना’ हे नाव आणि धनुष्यबाण हे चिन्ह मिंधे पार्टीस मिळाले. धनुष्यबाणाची पुण्याई मोठी आहे व शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी ‘धनुष्यबाण’ घराघरांत पोहोचवला. हे ‘पुण्य’ चोरून निवडणुका लढणारे खऱ्या शिवसेनेवर बोलत आहेत. शिवसेना व धनुष्यबाणाचा वाद आजही सर्वोच्च न्यायालयात अटकला आहे. सर्वोच्च न्यायालय माणिक कोकाटे यांची आमदारकी शाबूत राहावी म्हणून सहा तासांत निर्णय देते. तेथे तारखांवर तारखा पडत नाहीत, पण 40 आमदारांनी पक्षांतर केले त्यावर पक्षांतर बंदी कायद्याने व संविधानास धरून निर्णय देत नाही. शिवसेना व धनुष्यबाण चिन्ह कोणाचे यावर निर्णय देण्यास चालढकल करत आहे. या चोरलेल्या पक्ष आणि चोरलेल्या धनुष्यबाणावर मिंध्यांनी लोकसभा, विधानसभा आणि नगरपालिका लढवून यश मिळवले व आता महानगरपालिकांत त्यांना याच चिन्हाचा लाभ मिळावा म्हणून सर्वोच्च न्यायालयाने ‘चिन्हा’बाबतची अंतिम सुनावणी थेट 21 जानेवारीला म्हणजे मुंबईसह 29 महानगरपालिकांच्या निकालांनंतर ठेवली. लोकसभा, विधानसभा आणि नगरपालिकांनंतर चोरलेल्या धनुष्यबाणावर महापालिकांतही ‘लाभ’ करून घेण्याची मुभा सर्वोच्च न्यायालयाने
चोर कंपनीस
दिली. ही अमित शहा वगैरे महाराष्ट्र दुष्मनांची मिंध्यांवर कृपाच म्हणायला हवी. एकनाथ शिंदे यांनी अंबरनाथ, बदलापूर या नगरपालिकांत विजय मिळावा म्हणून शर्थ केली. शे-पाचशे कोटींचा खुर्दा उडवला, पण एवढा प्रचंड खर्च करूनही भाजपने शिंदे यांना मात दिली. राज्यातील नगरपालिका निवडणुकीत पैशांचे वादळ सुटल्याने देवेंद्र फडणवीस हे ‘धुरंधर’ ठरले. भाजप हा क्रमांक एकचा पक्ष बनला. राज्यात सर्वत्र बरबादी व थापेबाजीचे थैमान सुरू असताना सत्ताधाऱ्यांनी हा विजय मिळवला. पैसा, सत्ता व धमक्यांच्या जोरावर भाजप व शिंदे-पवारांनी मुसंडी मारली. नगरपालिका निवडणुकांनंतर राज्याचा चेहरा-मोहरा बदलण्याची भाषा मुख्यमंत्री फडणवीस यांनी केली. मग गेल्या सात-आठ वर्षांत राज्याचा चेहरा बिघडवण्याचे काम झाले काय? भाजपने 129 जागी नगराध्यक्ष निवडून आणले. विधानसभेत भाजपने याच आकड्यांत आमदार निवडून आणले. शिंदे व पवारांच्या जिंकलेल्या नगराध्यक्षांचा आकडा 54 व 37 आहे. हे आकडे विधानसभेत जिंकलेल्या आमदारांइतकेच आहेत. हा ईव्हीएमचा चमत्कार आहे की आणखी काही? याच आकड्यांत ‘ईव्हीएम’ सेट केल्याचा हा परिणाम तर नाही? या सगळ्यांवर मात करीत महाराष्ट्रातील विरोधी पक्षांनी निवडणुका लढवल्या. काँग्रेसने तर विदर्भात प्रचंड यश मिळवले. इतर स्थानिक आघाड्यांनी यश मिळवले. भाजप, अजित पवार, शिंदे यांनी निवडणूक प्रचारात
सरकारी यंत्रणांचा गैरवापर
केला. एकतर मतदारांना कोट्यवधी रुपयांचे वाटप केले, मते विकत घेतली. दुसरे म्हणजे नगरपालिकांना निधी हवा असेल तर आम्हाला विजयी करा, नाहीतर विकासासाठी एक दमडाही मिळणार नसल्याच्या धमक्या सत्ताधाऱ्यांनी दिल्या व निवडणूक आयोगाने त्यावर कोणतीच कारवाई केली नाही. विरोधी पक्षांचा सामना जसा सत्ताधाऱ्यांशी होता तसा निवडणूक आयोगाशी होता. महाराष्ट्रातील नगरपालिका निवडणुकांचे निकाल हे लिलावातून बोली लावून विकत घेतलेले निकाल आहेत. या निकालांत कोठेच प्रामाणिकपणा आणि पारदर्शकता आढळत नाही. यंत्रणा, मतदारांना विकत घेण्याची कला सत्ताधाऱ्यांना प्राप्त झाली आहे व मिंध्यांसारख्या लोकांना तर अमित शहा कृपेने शिवसेना आणि धनुष्यबाण चोरून निवडणूक लढवता आली. त्याचा परिणाम तर होणारच. मिंधे म्हणतात, ‘‘आता माझीच शिवसेना खरी!’’ काय खरे आणि काय खोटे, हे राज्यातील सामान्य जनता ओळखून आहे. ज्यांनी आपला विजय मोदी-शहांच्या चरणी अर्पण केला त्या चोरांच्या तोंडी ‘शिवसेना’ हे पवित्र नाव शोभत नाही. याच मोदी-शहांनी धनुष्यबाण चोरला आणि महाराष्ट्रातील अट्टल बेइमानांच्या हाती सोपवला. आता हे अट्टल म्हणत आहेत की, ‘‘आम्हीच खरे!’’ लोकसभा, विधानसभा व नगरपालिका असा चोरीचा ‘इजा, बिजा, तिजा’ झाला आहे. यापुढचे चित्र वेगळे असेल याविषयी आमच्या मनात शंका नाही.

































































