दादर, माहीम, वांद्रे, अंधेरीमध्ये शुक्रवारपर्यंत पाणीपुरवठा विस्कळीत; जलवाहिनी बदलाच्या कामाचा परिणाम

पालिकेच्या माध्यमातून जी उत्तर दादर, माहीम, अंधेरी पूर्व आणि वांद्रे पूर्व भागातील मोठय़ा आकाराच्या जलवाहिन्या बदलण्याचे काम पालिकेने हाती घेतल्यामुळे संबंधित भागातील पाणीपुरवठा विस्कळीत होणार आहे. सोमवारी 10 वाजल्यापासून सुरू झालेले हे काम शुक्रवार दुपारी 1 वाजेपर्यंत चालणार आहे.

जलवाहिनींच्या कामामुळे संबंधित भागांमध्ये कमी दाबाने पाणीपुरवठा केला जाणार आहे. शिवाय नियमित पाणीपुरवठय़ाच्या वेळेतही बदल केला जाणार आहे. मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या (एमएमआरडीए) मेट्रो लाईन 7 अ प्रकल्पाच्या कामासाठी 2400 मिलीमीटर व्यासाच्या अपर वैतरणा मुख्य जलवाहिनीचा काही भाग वळविण्यात आला आहे. या वळविण्यात आलेल्या भागाचे छेद – जोडणीचे (क्रॉस – कनेक्शन) काम पालिकेकडून करण्यात येणार आहे. ही कार्यवाही अत्यंत महत्त्वाची असून नियोजनबद्ध पद्धतीने व तांत्रिक निकषांचे पालन करून करण्यात येणार आहे. या दरम्यान नागरिकांना पाणीपुरवठय़ात कमीत कमी अडथळा येईल, यासाठी आवश्यक ते नियोजन करण्यात आले असल्याचे पालिकेकडून सांगण्यात आले.