
उत्तर प्रदेशातील संभळ जिल्ह्यातून एक अत्यंत धक्कादायक आणि क्रूर घटना समोर आली आहे. एका महिलेने आपल्या प्रियकराच्या मदतीने पतीची निर्घृण हत्या केली आणि त्यानंतर पुरावा नष्ट करण्यासाठी चक्क लाकूड कापण्याच्या ग्राइंडरचा वापर करून मृतदेहाचे तुकडे केले. या प्रकरणी चंदौसी पोलिसांनी आरोपी पत्नी रुबी आणि तिचा प्रियकर गौरव या दोघांना अटक केली आहे. 18 नोव्हेंबरपासून बेपत्ता असलेल्या राहुल नावाच्या व्यक्तीचा शोध घेत असताना या थरारक हत्याकांडाचा उलगडा झाला.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रुबीने 18 नोव्हेंबर रोजी तिचा पती राहुल बेपत्ता असल्याची तक्रार नोंदवली होती. दरम्यान एका महिन्यानंतर 15 डिसेंबर रोजी ईदगाह भागातील एका नाल्यात छिन्नविछिन्न अवस्थेत एक मृतदेह सापडला. या मृतदेहाचे डोके, हात आणि पाय गायब होते, परंतु छातीवर ‘राहुल’ नावाचा टॅटू असल्याने पोलिसांना संशय आला. यानंतर पोलिसांनी सूत्र हलवली आणि तपासाला सुरूवात केली. सर्वप्रथम त्याची पत्नी रुबीची कसून चौकशी केली असता तिने आपला गुन्हा कबूल केला.
दरम्यान पोलिसांनी पुढील तपास केला असता अनेक गोष्टी समोर आल्या. राहुलने रुबी आणि गौरव यांना आक्षेपार्ह अवस्थेत रंगेहात पकडले होते. यामुळे राहुल आणि रुबी यांच्यात जोरदार वाद झाला होता. आपले प्रेमसंबंध उघड होऊ नयेत या भीतीने रुबी आणि गौरवने राहुलवर लोखंडी रॉड आणि हातोड्याने हल्ला करून त्याला जागीच ठार केले. त्यानंतर त्यांनी एक ग्राइंडर मशीन आणले आणि राहुलच्या मृतदेहाचे तुकडे केले. मृतदेहाचा धड त्यांनी जवळच्या नाल्यात फेकला, तर डोके आणि इतर अवयव राजघाट येथे नेऊन गंगा नदीत फेकून दिले.
पोलिसांनी हत्येसाठी वापरलेले ग्राइंडर मशीन, हातोडा आणि इतर हत्यारे जप्त केली आहेत. या क्रूर कृत्यामुळे संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे.


























































