9 to 5 जॉब नको, आता स्वप्नांची भरारी हवी! GenZ ची करिअरबाबत नवी व्याख्या

आजच्या डिजिटल युगात जगभरातील तरुणाई स्वावलंबी बनण्यासाठी लढत आहे. तरुणांमधील करिअरच्या संकल्पना दिवसेंदिवस बदलत आहेत. वडिलधाऱ्या लोकांनी सांगितल्याप्रमाणे ‘कॉलेजचे शिक्षण पूर्ण झाल्यानंतर नोकरी शोधायची आणि निवृत्तीपर्यंत एकच स्थिर नोकरी करायची’ असा जो पायंडा पाडला होता, तो आता ‘जेन झी’ (Gen Z) पिढीला नकोसा वाटू लागला आहे. सकाळी 9 ते संध्याकाळी 5 या ठराविक वेळेतील नोकरी करण्यापेक्षा स्वतःच्या मानसिक आरोग्याला महत्त्व देऊन हव्या त्या वेळेत काम करणे आणि कामात विविधता शोधणे याला ही पिढी अधिक महत्त्व देत आहे. यामुळेच कॅम्पस प्लेसमेंटच्या रांगेत उभे राहून वेळ घालवण्याऐवजी अनेक तरुण आता स्वतंत्रपणे काम करण्याला (Freelancing) पसंती देत आहेत.

‘अपवर्क’ (Upwork) ने दिलेल्या अहवालानुसार, जगभरातील 52 टक्क्यांहून अधिक जेन झी आधीच फ्रीलान्सिंग क्षेत्राशी जोडले गेले आहेत. त्यांच्यासाठी हे काम केवळ फावल्या वेळेत केलेला जॉब नसून त्यांचा करिअरमधील महत्त्वाचा मार्ग बनला आहे. फ्रीलान्सिंग सोबतच सुमारे 39 टक्के तरुण पोर्टफोलिओ करिअरची’ (Portfolio Career) निवड करत आहेत. यामोध्ये ते एकाच वेळी अनेक कंपन्यासोबत किंवा ग्राहकांसाठी वेगवेगळी कामे करतात. याद्वारे ते दिवसाला हवे तसे पैसे कमवू शकतात, अशी माहिती इंडिया टुडेच्या वृत्तात दिली आहे.

मिलेनियल्सच्या म्हणण्यानुसार, एखादा फिक्स जॉब केला की इतर आर्थिक गोष्टींचा ताळमेळ बसवणे सोपे होते. म्हणजेच जॉबमधून येणारे फिक्स इन्कम तुमच्या आर्थिक व्यवहाराला हाथभार लावते. मात्र, या ‘जेन झी’ पिढीसाठी आर्थिक व्यवहाराची व्याख्याही बदलली आहे. बंगळुरूतील एका इंजिनीअरिंग विद्यार्थ्याच्या मते, “एकाच कंपनीवर अवलंबून राहण्यापेक्षा पाच वेगवेगळ्या ग्राहकांसाठी काम करणे जास्त सुरक्षित वाटते. कारण एखादा ग्राहक जरी कमी झाला, तरी उत्पन्नाचे इतर स्रोत सुरू राहतात. ही ‘डायव्हर्सिफिकेशनची वृत्ती जेन झीला अधिक आत्मविश्वास देत आहे. एकच नोकरी करण्यामध्ये जेवढी रिस्क आहे, त्यापेक्षा स्वतःचे कौशल्य वापरून स्वतंत्रपणे काम करणे अधिक फायदेशीर आहे. असे त्यांचे मत आहे.

फ्रीलान्सिंगकडे तरुणाईचा कल वाढत चालला असून यामागे काही प्रमुख कारणे आहेत. फ्रीलान्सिंगमध्ये कामाची लवचिकता कुठूनही काम करण्याचे स्वातंत्र्य आणि हवे ते काम करण्याची संधी मिळते. हे काम करून जेन झींना फक्त पैसे कमवायचे नसून आपल्या कामातून स्वतःची ओळख निर्माण करायची आहे. आजची तरुणाई पदवीपेक्षा कौशल्याला (Skill-led careers) अधिक महत्त्व देताना दिसत असल्याचे अहवालातून समोर आहे.

जेन झी पिढी करिअरच्या जुन्या पाऊलवाटा सोडून स्वतःचा नवीन रस्ता तयार करत आहे. जेनझींना नोकरी करून आपलं आयुष्य घालवायचं नसून मनाला आवडेल ते आणि हव्या त्या वेळेत काम करायचे आहे. यामध्ये कामाचा ताण कमी होतो, शिवाय वरिष्ठांची बोलणी देखील ऐकावी लागत नाहीत, असे या पिढीचे मत आहे. भविष्यात हे ‘पोर्टफोलिओ करिअर’ मॉडेल नोकरीत मोठी क्रांती घडवून आणण्याची शक्यता नाकारता येत नाही.