
हिंदुस्थानी क्रिकेटमध्ये सध्या दोन गोष्टी जोरात सुरू आहेत. एकीकडे विराट कोहलीच्या धावा, आणि दुसरीकडे सोशल मीडियावर गौतम गंभीरवर धावा. कारण कोहलीने गेल्या सहा एकदिवसीय सामन्यांत असा काही ‘रनपाऊस’ पाडलाय की, आकडे पाहूनच टीकाकारांची बॅट गळून पडते.
कोहलीच्या मागील सहा डावांत 584 धावा, सरासरी 146 आणि स्ट्राईक रेट 116.56. म्हणजे संयम आणि आक्रमकतेचाही परफेक्ट डोस. त्यात तीन शतके आणि तीन अर्धशतके. ‘वन डेत विराट संपलाय’ म्हणणाऱ्यांसाठी हा थेट कव्हर ड्राइव्हच म्हणावा लागेल.
कोहलीच्या बॅटमधून धावा बरसताच चाहते गौतम गंभीरवरही आपसूकच बरसतात. काही चाहत्यांनी असा सूर लावला की, कोहलीला स्वतःला सिद्ध करावं लागतंय आणि तेही बॅटने. परिणामी, कोहलीबाबत साशंकता व्यक्त करणाऱ्या गंभीरवर मीम्स, पोस्ट्स आणि टोमणे या सगळय़ांचा धुवांधार मारा सुरू झालाय. विराटच्या धावांमुळे गंभीरला आपले स्थान राखण्यासाठी देवाचा धावा करावा लागणार, अशीही चर्चा रंगू लागलीय.
गेल्या सहा डावांत कोहलीचे रनरंग
दिल्ली विरुद्ध गुजरात ः 77 धावा (बंगळुरू) – 13 चौकार, 1 षटकार. शतक हुकलं, पण संदेश पोहोचला. ही खेळी म्हणजे मी अजून इथेच आहे.
दिल्लीविरुद्ध आंध्र प्रदेश ः 131 धावा (बंगळुरू) – देशांतर्गत क्रिकेटमध्ये पुनरागमन आणि थेट शतक. कोहली म्हणाला, फॉर्म हरवला म्हणता? हे बघा!
हिंदुस्थान विरुद्ध दक्षिण आफ्रिका ः 65 (विशाखापट्टणम) – संयमी कोहली. संघ जिंकला, कोहली नाबाद राहिला. काम झालं की शांतपणे पॅव्हेलियन.
हिंदुस्थान विरुद्ध दक्षिण आफ्रिका ः 102 (रायपूर) – शतकाचा क्लास. स्ट्राईक रेटही भारी. ट्रोल्ससाठी नो-बॉल!
हिंदुस्थान विरुद्ध दक्षिण आफ्रिका ः 135 (रांची) – पूर्ण कोहली अवतार! गोलंदाज फिरले, सोशल मीडिया पेटलं.
हिंदुस्थान विरुद्ध ऑस्ट्रेलिया ः 74 (सिडनी) – चेस मास्टर पुन्हा रंगात. मॅच संपली, कोहली उभाच!























































