
65 लाखांचा हेव्ही डिपॉझिटचा अपहार करून फ्लॅटमालकाने एका विवाहित महिलेची फसवणूक केल्याचा प्रकार समोर आला आहे. सुलेमान अहमद शेख असे आरोपीचे नाव असून त्याच्याविरोधात डी. एन. नगर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
तक्रारदार महिला ही अंधेरी परिसरात राहते. अंधेरीतील सागरसिटी, पॅसिफिक टॉवर अपार्टमेंटमध्ये सुलेमान याच्या मालकीचा एक फ्लॅट आहेत. तीन वर्षांपूर्वी तक्रारदार महिला तिच्या कुटुंबीयांसोबत सुलेमानच्या फ्लॅटवर हेवी डिपॉझिट करारावर राहत होती. यावेळी तिच्यासह तिच्या पतीने सुलेमान यास तीस लाख रुपये हेवी डिपॉझिट म्हणून दिले होते. तसेच कराराप्रमाणे ते त्याला दरमहा पाचशे रुपये भाडे देत होते. गेल्या वर्षी मार्च महिन्यात त्यांचा दोन वर्षांचा भाडेकरार संपला. त्यामुळे विवाहितेने सुलेमानकडे आणखीन एक वर्षाचा करार करण्याची विनंती केली होती. हे शेख याने मान्य केल्यानंतर त्याला आणखी 24 लाख रुपये हेवी डिपॉझिट म्हणून दिले होते.
दरम्यान, सुलेमानने त्यांना त्यांच्याकडून घेतलेले 55 लाखांची हेवी डिपॉझिटची रक्कम शक्य नसल्याने त्यांनी त्याचा फ्लॅट विकत घेण्यास सांगितले. त्यानुसार त्यांच्यात फ्लॅट खरेदी-विक्रीचा एक कोटी पाच लाखांमध्ये व्यवहार झाला, मात्र हा व्यवहार करताना त्याने या फ्लॅटवर कर्ज असल्याची माहिती दिली नव्हती.






























































