
चंद्रपूर जिल्ह्यातील राजुरा येथील बांधकाम कंत्राटदाराचे अपहरण करून बंदुकीचा धाक दाखवत त्याच्याकडून तब्बल 18 लाख 50 हजार रुपके उकळल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. चंद्रपूर-नागपूर महामार्गावरील शनि मंदिर परिसरात ही घटना घडली. या प्रकरणी पडोली पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी तीन आरोपांना अटक केली आहे. आकाश वाढई, भारत माडेश्वर, योगेश गोरडवार अशी आरोपींची नावे आहेत.
राजुरा येथील बांधकाम कंत्राटदार शैलेश काहिलकर कार सर्व्हिसिंगसाठी मोरवा येथील शोरूममध्ये गेले होते. त्यांना अनोळखी व्यक्तीने फोन करून भेटायचे आहे, अशी विचारणा केली. काहीलकर यांनी शोरूमचा पत्ता दिला. काहिलकर यांना विश्वासात घेत दोघांनी गाडीत बसविले आणि त्यांचे अपहरण केले. काही अंतरावर आरोपींनी बंदूक रोखत पैशाची मागणी केली.
काहिलकर यांनी पैसे नसल्याचे सांगितल्यावर अपहरणकर्त्यांनी त्यांना जीवे मारण्याची धमकी दिली. आरोपींनी मध्यरात्री काहिलकर यांना राजुरा येथील घरी नेले. जीवाच्या भीतीने काहिलकर यांनी घरातून 18 लाख 50 हजार रुपयांची रोकड आणून त्या अपहरणकर्त्याच्या स्वाधीन केली. पैसे मिळताच अपहरणकर्ते तेथून पसार झाले. या प्रकाराची तक्रार काहिलकर यांनी पोलिसात दिली. पोलिसांनी याप्रकरणी तिघांना अटक केली असून पुढील तपास पोलीस निरीक्षक योगेश ठिवसे करीत आहे.

































































