
>> समीर गायकवाड
सर्वकालीन मानवी भावनांचे यथार्थ शब्दांकन जिव्हाळ शैलीत मांडणारे हिंदी साहित्यिक विनोदकुमार शुक्ल यांचे नुकतेच निधन झाले. माणूस आणि मानवता हा साहित्यभाव कायम त्यांच्या लेखनाच्या केंद्रस्थानी राहिला.
विनोद कुमार शुक्ल हिंदी साहित्यातील महान सृजन साहित्यिक, 23 डिसेंबर रोजी रायपूर येथे त्यांनी अंतिम श्वास घेतला. वयाच्या 88 व्या वर्षी वृद्धापकाळाने अल्पशा आजाराने त्यांचे निधन झाले. ते देहरूपाने गेले, परंतु त्यांच्या शब्दांच्या गहन शांततेतून निर्माण झालेला साहित्यिक वारसा चिरंतन राहणार आहे. शुक्ल यांचे साहित्य आणि त्यातला आशय कालातीत आहे. सर्वकालीन मानवी भावनांचे यथार्थ शब्दांकन त्यांच्या साहित्यात जिव्हाळ शैलीत समोर येते. हे साहित्य मानवी जीवन व्यवहारातील दैनंदिन घटनांची नेटकी आणि नेमकी नोंद घेते.
वैयक्तिक जीवनाच्या साधेपणात लपलेली गहनता ही शुक्ल यांच्या व्यक्तिमत्त्वाची ओळख होती. 1 जानेवारी 1937 रोजी छत्तीसगढमधील राजनंदगाव येथे जन्मलेल्या शुक्ल यांचे बालपण सामान्य कुटुंबात व्यतीत झाले. रायपूर येथील कृषी महाविद्यालयात ते अनेक वर्षे व्याख्याता होते. ज्यातून त्यांच्या लेखनाला एक व्यावहारिक आणि मातीशी जोडलेली दृष्टी मिळाली. कृषी महाविद्यालयात अध्यापकाचे काम केल्याने कृषक जीवन आणि मातीशी त्यांची नाळ घट्ट जुळली. ‘जो मेरे घर कभी नही आएंगे’ या कवितेत याची उत्कट प्रचीती येते. त्यात ते म्हणतात – ‘जे माझ्या घरी कधी येणार नाहीत त्यांची भेट घेण्यासाठी मी त्यांच्याकडे जाईन. पर्वत, टेकडय़ा, शिळा, तलाव, अगणित झाडं शेती कधी येणार नाहीत माझ्या घरी, शेत शिवारासारख्या माणसांना भेटण्यासाठी गावागावांत, जंगलांत, गल्लोगल्ल्यांत जाईन.’ किती प्रेमाद्भुत आणि स्नेहार्द्र विचार आहेत हे. शेतीमातीच्या माणसांविषयीच्या कृतज्ञतेची देखणी अभिव्यक्ती म्हणून याकडे पाहता येईल.
त्यांचं वैयक्तिक आयुष्य खूप दगदगीचे वा कठोर मेहनतीचे नसले तरी श्रम आणि कारुण्य यांना त्यांच्या साहित्यात मायेचे स्थान होते. साहित्यिक कारकीर्दीचा आढावा घेताना शुक्ल यांच्या सहा दशकांच्या सांस्कृतिक, वैचारिक प्रवासाचे वैशिष्टय़ दिसते. ते साधेपणातून उद्भवलेल्या जादुई यथार्थवादाचे प्रतिनिधी होते. 1971 मध्ये त्यांचा पहिला कवितासंग्रह ‘लगभग जय हिंद’ प्रकाशित झाला. त्यानंतर ‘वह आदमी चला गया नया गरम कोट पहनकर विचार की तरह’, ‘सब कुछ होना बचा रहेगा’ हे कवितासंग्रह आले. ‘नौकर की कमीज’, ‘खिलेगा तो देखेंगे’, ‘दीवार में एक खिड़की रहती थी’ आणि ‘एक चुप्पी जगह’ या कादंबऱया, लघुकथा संग्रह ‘पेड़ पर कमरा’ यात त्यांच्या लेखनाची अनोखी शैली दिसते. पुरस्कारांच्या मालिकेत साहित्य अकादमी (1999), 2023 मध्ये पेन/नाबोकोव्ह आंतरराष्ट्रीय साहित्य पुरस्कार जिंकणारे ते पाहिले भारतीय साहित्यिक ठरले. काही दिवसांपूर्वी त्यांना गतवर्षीचा ज्ञानपीठ पुरस्कार प्रदान करण्यात आला.
त्यांच्या कवितांमधून त्यांच्या शब्दांच्या साधेपणात दडलेला गहन अर्थ लक्षात येतो. ‘एक आदमी हताश होकर बैठ गया’ या कवितेत मानवीय सहानुभूतीचे सूक्ष्म चित्रण दिसते. दुसऱया कवितेत ‘मैं अपने पैरों से नहीं’मध्ये ते जीवनाच्या दैनंदिन संघर्षांना स्पर्श करतात. ‘मैं उड़ नहीं सकता’ ही कविता तितकी आणि पक्ष्याच्या उडण्याची तुलना करून स्वातंत्र्याच्या भावनेचे वर्णन करते. ‘एक गली बाजार में’ ही कविता बाजारातील गर्दी आणि वैयक्तिक अलगावाचे चित्रण करते. या कविता त्यांच्या साहित्याच्या केंद्रस्थानी आहेत, ज्यात वस्तू आणि भावनांना जिवंत करणारी शैली आहे.
राजकीय, सामाजिक टिप्पणी करणाऱया शुक्ल यांच्या साहित्याविषयी राजकीय सामाजिक वर्तुळातदेखील आदराची स्नेहाची भावना दिसते. मन विदीर्ण होईल अशा शब्दांत त्यांनी कुणाला टोकले नसले तरी शेलक्या शब्दांत त्यांनी अनेकदा मार्मिक भाष्य केलं हे कुणी नाकारू शकत नाही.
विनोद कुमार शुक्ल यांचा साहित्य विचार हा साधेपण आणि आत्म-विलोपनाचा होता. ते साहित्याला स्वतच्या अभिव्यक्तीचे साधन नव्हे तर स्वतला विसरून सृजन प्रक्रियेत विलीन होण्याचे माध्यम मानत. त्यांच्या मते, साहित्य हे अलंकृत भाषेपेक्षा चिंतनशील साधेपणातून उद्भवते, ज्यात वस्तू सजीव पात्र बनतात आणि सामान्य जीवनाच्या काव्यात्मक गुणवत्तेचे दर्शन घडते. ‘नई कविता’ किंवा ‘प्रयोगवाद’ चळवळीशी जोडलेले त्यांचे लेखन गरीबांच्या, वंचितांच्या, शोषितांच्या अनुभवांना भावविभोर होऊन चित्रित करते. ते म्हणत, ‘मैं कल्पना की सच्चाई में विश्वास करता हूँ.’ ज्यातून कल्पनेच्या शक्तीवर विश्वास दिसतो.
माणूस आणि मानवता हा त्यांच्या साहित्याच्या केंद्रस्थानी असणारा साहित्यभाव. आजकाल हे आशयविषय फारसे हाताळले जात नाहीत आणि उथळ होत चाललेल्या बाजारू साहित्यिकांच्या मांदियाळीत विनोद कुमार यांचे नाव अधिक उत्तुंग आणि उदात्त वाटते. त्यांनी मांडलेल्या विचारांचे अवलंबन करणे ही खरी श्रद्धांजली!

























































