निमित्त – वर्षाचा पंचनामा

>> सॅबी परेरा

 डिसेंबर आला की प्रत्येकाचं सरत्या वर्षाचं ऑडिट सुरू होतं. आपण काय करू शकलो? काय करायचं राहून गेलं? याचा आढावा घेताना येणारे वर्ष आपल्या खात्यात 12 महिन्यांचे 365 दिवस जमा करणार आहे. तेव्हा ‘डोण्ट वरी बी हॅपी!’ हे वचन लक्षात असू द्या!

डिसेंबर हा महिना नाहीये, तो पंचनामाच असतो आपल्या वर्षभराच्या चुकांचा. डिसेंबर हा आपल्या वर्षभराच्या चुका ‘अनुभव’ म्हणून रॅप करून देण्याचा महिना. सरत्या वर्षाला निरोप देताना स्वतलाच समजावण्याचा महिना. मनातील चांगल्या संकल्पांची सुरुवात नव्या वर्षाच्या पहिल्या दिवसावर ढकलता येण्याची सोय असलेला महिना. या महिन्यात थंडीपेक्षा जुन्या आठवणींमुळे अधिक हुडहुडी भरून येते. या थंडीच्या महिन्यात पुढय़ात पेटलेल्या शेकोटीच्या उबेपेक्षा भविष्याची धग अधिक जाणवू लागते. डिसेंबर आला की प्रत्येकाचं सरत्या वर्षाचं ऑडिट सुरू होतं. पैसे कुठे गेले? वेळ कुठे गेला आणि आपण कुठे गेलो?

आपल्या एका फोन कॉलवर दोन देशांतील युद्ध थांबावे अशी काही सामान्य माणसाची महत्त्वाकांक्षा नसते. आपल्याला नोकरीत चांगली पगारवाढ मिळावी, तीन-चार वर्षांत एकदा पदोन्नती मिळावी. शाळा-कॉलेजात जाणारी आपली मुलं चांगल्या गुणांनी उत्तीर्ण व्हावी. आपल्या कुटुंबाला चांगले कपडेलत्ते, खायला-प्यायला आणि माफक करमणूक देता येण्याइतपत आपली सांपत्तिक स्थिती बरी असावी. घरादारात कुणाला मोठं आजारपण येऊ नये. कुणाचं अकाली निधन होऊ नये. अशा छोटय़ा-छोटय़ा अपेक्षा घेऊनच सामान्य माणूस नवीन वर्षात पाऊल ठेवत असतो. या सगळ्या अपेक्षा पूर्ण व्हाव्यात असाही त्याचा आग्रह नसतो. शालेय वयापासून पस्तीस टक्क्याला उत्तीर्ण समजण्याची सवय आपल्या हाडीमांसी भिनलेली असल्याने नवीन वर्षाकडून आपल्याला असलेल्या अपेक्षांपैकी पन्नास टक्के अपेक्षा जरी पूर्ण झाल्या तरी आपल्यासारखी सामान्य माणसे समाधानी होऊन जातात.

सरत्या वर्षात आपण काय काय करायचं ठरवलं होतं? त्यापैकी आपण काय करू शकलो? काय करायचं राहून गेलं? याचा मी दरवर्षी डिसेंबरच्या शेवटच्या आठवडय़ात आढावा घेतो आणि पुढील वर्षासाठी काही संकल्प करतो. काल तसाच सन 2025 चा आढावा घेण्यासाठी बसलो होतो. माझ्या मागील वर्षीच्या डायरीतील 30 डिसेंबरच्या नोंदी  पाहिल्या आणि लक्षात आलं की, मागील वर्षी आपल्या हातून घडलेल्या चुका व नवीन वर्षासाठी केलेले संकल्प ज्या पानावर लिहिलेले होते ते पान जस्संच्या तस्सं यंदाच्या डायरीत कॉपी केलं तरी चालतंय की! आढावा घेणे, आत्मपरीक्षण करणे आणि त्यातून काहीच धडा न घेता जुन्याच चुका नव्याने करीत राहणे याबाबतीत माझा लौकिक आहे. सध्या मी ख्रिसमसच्या सुट्टीवर असून काही कामधाम नसल्याने मोकळाच आहे. कुणा व्यक्तीला, संस्थेला किंवा राजकीय पक्षाला आढावा, आत्मपरीक्षण आणि संकल्प करण्यासाठी भाडय़ाने माणूस हवा असेल तर कृपया माझ्याशी संपर्क करा.

सगळे दिवस सारखेच. वर्ष बदललं म्हणून आपलं आयुष्य बदलेल, आपलं भागधेय बदलेल अशी अपेक्षा ठेवणेच मुळात चुकीचे आहे. कोणतंही वर्ष आपल्यासाठी बरं किंवा वाईट असं काहीच करीत नाही. जे काय करायचं ते आपल्यालाच करावे लागणार आहे. स्वत काही हातपाय न हलवता मागील वर्ष अत्यंत वाईट गेले, दुःखात गेले मात्र येणारे वर्ष आनंदाचे, सुखाचे असणार आहे असे वाटून घेणे म्हणजे गुलशन ग्रोवर छेडतो म्हणून मोठय़ा अपेक्षेने शक्ती कपूरच्या मिठीत शिरण्यासारखे आहे.

स्पर्धा आणि त्यातून निर्माण होणारी ईर्षा हेच सर्व दुःखाचं मूळ कारण आहे. त्यामुळे मी नवीन वर्ष 2026 साठी इतकाच संकल्प केलाय की, यापुढे कुणाशीच, कसलीच स्पर्धा करायची नाही. केवळ जानेवारीच्या पहिल्या आठवडय़ात मॉर्निंग वॉकला जाणाऱया आरंभशूर चमकेश लोकांशी स्पर्धा नको आणि वर्षभर न चुकता, पहाटे लवकर उठून मॉर्निंग वॉकला जाणाऱया, व्यायाम करणाऱया, शिस्तीचं अवडंबर माजविणाऱया लोकांशीही स्पर्धा नको. ‘ठेविले अनंते तैसेचि राहावे, अंगच्या चरबीस वाढो द्यावे!’

प्रत्येक वेळी नवीन वर्ष उगवतं तेव्हा आपल्या खात्यात जमा झालेले 12 महिन्यांचे 365 दिवस पाहून आपल्याला हर्ष होतो. वर्षाचे अकरा महिने भुर्रर्र उडून जातात आणि डिसेंबरमधे ध्यानात येतं की, नवीन वर्ष हे पालेभाजी सारखं असतं. शिजवायला घेतली तर कढईत मावत नाही अन् वाढायला घेतली तर पुरत नाही. मागील अनेक वर्षांप्रमाणेच इसवी सन 2025 हे वर्षदेखील माझ्याप्रमाणे तुमचंसुद्धा क्रिकेटच्या मेडन ओवरसारखं भाकड गेलेलं असेल. काहीही स्कोअर करता आलेला नसेल. तरी नाराज व्हायचं कारण नाही. आपण अजून खेळपट्टीवर आहोत, आपली विकेट अजून शाबूत आहे यात आपल्याला आनंद मानता यायला हवा. कारण आपण खेळपट्टीवर पाय रोवून असताना आपल्या उरात शतक ठोकायची धमक जागृत असेल तर आयुष्याचा हा गेम आपण कधीही आपल्या बाजूने फिरवू शकतो.

‘‘सरत्या वर्षात सगळंच काही वाईट घडलं असं म्हणता येणार नाही. अनेक चांगल्या गोष्टीदेखील घडल्या. मतदार यादीत नसलेल्या कित्येक लोकांना, अगदी विदेशी लोकांनासुद्धा भारतात मतदान करण्याची संधी मिळाली, काहींना तर ही संधी वेगवेगळ्या मतदारसंघांत डझनभर वेळा मिळाली. इतिहासात कधीच न घडलेल्या घटनांवरील ऐतिहासिक सिनेमे पाहायला मिळाले. कित्येक शहरांना आणि शासनाच्या अनेक जुन्या योजनांना नवी कोरी नावे मिळाली. तयार होऊन वापर सुरू होण्याआधीच अनेक पूल आणि फ्लायओव्हर पडल्यामुळे अनेकांचे जीव वाचले. इतकी वर्षे वारेमाप जीएसटी गोळा केल्यानंतर सरकारने यंदा जीएसटी कमी करून ग्राहकांना दिलासा दिला. देशभक्त, देशद्रोही, निर्दोष इत्यादी शब्दांचे अर्थ नव्याने जनतेला कळले. दाऊद, मसूद अजहर यांसारखे अतिरेकी यंदा पुन्हा एकदा मरण पावले. या सगळ्या सकारात्मक गोष्टी आपण सेलिब्रेट करायला हव्यात,’’ असा मेसेज मी आमच्या विश्व ‘चषक’मंडळाच्या व्हाट्सआप ग्रुपवर टाकला तेव्हा सर्वांनी या महिन्याच्या 31 तारखेला होणार असलेले, संपूर्ण जगातून उघडय़ा डोळ्यांनी पाहता येणारे ‘थंडग्लास’ ग्रहण साजरे करावयाचे ठरविले आहे. तुम्हीदेखील ते आपापल्या इष्टमित्रांसोबत साजरे करावे अशी माझी इच्छा आहे.

[email protected]