
>> डॉ. वंदना बोकील-कुलकर्णी
शिक्षणाने स्त्रिया बिघडतील, असा अपप्रचार ज्या काळात जोरकसपणे केला जात होता त्या काळात पंडिता रमाबाई यांनी स्त्रियांच्या शिक्षणाचं महत्त्व पटवून दिलं. ‘स्त्रीच्या उत्कर्षाचा पाया आत्मवलंबन आहे.’ हा त्या काळातील धाडसी आग्रह धरणाऱ्या पंडिता रमाबाई यांचा उद्गार म्हणजे आजच्या सामाजिक समानतेचा पायाच.
गेल्या वेळच्या लेखात आपण ताराबाई शिंदे यांच्या तेजस्वी लेखणीविषयी जाणून घेतलं. ताराबाईंचे ‘स्त्राr-पुरुष तुलना’ हे छोटेखानी पुस्तक प्रकाशित झाले त्याच वर्षी म्हणजे 1882 मध्येच पंडिता रमाबाई यांचे ‘स्त्री-धर्मनीती’ हे पुस्तक प्रकाशित झाले. म. फुले यांनी आपल्या एका रचनेत या दोघींचा एकत्र उल्लेख केला आहे. ते लिहितात,
ताराबाई पंडिता रमा यास।
जाति दादा वैभव शिकविण्यास।
स्वस्त्रियेते जरि ज्ञान दिले होय।
रमा तारेशी तरिच शिकवू जाय।।
या दोघींशी बरोबरी करण्याची किंवा त्यांना काही चार शब्द सुनावण्याची क्षमता त्या काळच्या अनेक सुशिक्षित पुरुषांमध्येही नव्हती, असे फुले यातून सूचित करतात. पंडिता रमाबाई खरोखरच अत्यंत विद्वान होत्या. मराठी, इंग्रजी, संस्कृत, ग्रीक, लॅटिन आणि हिब्रू या भाषांवर त्यांचे प्रभुत्व होते. इंग्रजी आणि मराठी भाषांत त्यांनी तेरा ग्रंथ लिहिले आहेत. यातल्या ‘स्त्री-धर्मनीती’ या पुस्तकाचा संदर्भ आपल्या या सदराच्या दृष्टीनं महत्त्वाचा. त्यांनी अवघ्या चोविसाव्या वर्षी हे पुस्तक लिहिलं. या पुस्तकाच्या प्रस्तावनेत त्यांनी लिहिलंय, ‘सांप्रत काळी आमच्या हतभागी देशातील स्त्राrजातीची दशा किती शोचनीय आहे हे सांगता पुरवत नाही. या देशातील स्त्रिया अगदी असहाय आणि ज्ञानशून्य आहेत. त्यामुळे त्यास आपले हित कसे प्राप्त करून घ्यावे, हेही समजत नाही. याकरिता ज्ञानी लोकांनी त्यांचे हित काय केल्याने होईल, हे सांगून त्यांजकडून त्याप्रमाणे आचरण करविले पाहिजे.’ आणि पुत्यांनी “स्त्रीच्या उत्कर्षाचा पाया आत्मवलंबन आहे’’ असं सांगितलं आहे. रमाबाईंची भाषा मृदू आणि आर्जवी आहे. “ईश्वराने तुम्हांस नुसती स्वयंपाकादी कामे करण्यास जन्माला घातले नाही.’’ असं त्या सांगतात. शिक्षणाच्या सहाय्याने अधिकाधिक उन्नत जीवन जगण्याकडे त्यांचा कल आहे, आणि तोच उपदेश त्यांनी स्त्रियांना केला आहे. तो र्रूस्त नाही. प्रयत्नवाद आणि विद्याग्रहण यांची जोड त्यांना आवश्यक वाटते. स्त्राr-पुरुष समानतेला त्या महत्त्व देतात. शिक्षणाने स्त्रिया बिघडतील, असा अपप्रचार ज्या काळात जोरकसपणे केला जात होता त्या काळात त्यांनी स्त्रियांच्या शिक्षणाचं महत्त्व पटवून दिलं.
‘युनायटेड स्टेट्सची सद्यस्थिती व प्रवासवृत्त’ या पुस्तकात तर त्यांनी अमेरिकेतील स्त्रियांची परिस्थिती पाहून घरकामाच्या मूल्याचा प्रश्न उपस्थित केला आहे आणि ‘अमेरिकन पुरुषही भारतीय पुरुषांप्रमाणे निलाजरे आहेत’, असे अत्यंत धीट विधान केले आहे.
या काळात विविध नियतकालिकांतून काही स्त्रिया आपली मते धाडसाने मांडू लागल्या होत्या. ‘आपली भगिनी’ या नावाने एका स्त्राrने 1886 च्या ‘इंदुप्रकाश’मध्ये म्हटलं आहे, “बालविवाह, विधवा विवाह यांवर मनस्वी चर्चा चालली आहे; पण बहुतेक सगळे पुरुषांचेच म्हणणे असते. आमचे नुकसान करणाऱया या दोन चाली मोडून टाकण्याचे मनावर घ्याल तर त्याबद्दल आम्ही आपले आभार मानू. असे केल्याने पुरुषांची थोडी गैरसोय होणार आहे हे आम्ही समजतो व म्हणूनच आपण या कामी हात घालत नाही. या गोष्टी आपणास माहीत नाहीत असे नाही. मग जागृतास जागे करावे तरी कसे?’’
झोपेचे सोंग घेऊन बसलेल्या समाजाला असा थेट प्रश्न करण्याचं धाडस काही स्त्रिया तरी दाखवत होत्या हे विशेष. मात्र हेही लक्षात घ्यायला हवं की, स्वतच्या नावानिशी असे धाडसी विचार मांडणाऱया स्त्रिया कमीच होत्या आणि ते स्वाभाविकही म्हणावे लागते. म्हणूनच कित्येक निनावी पत्रे ही स्त्रियांची असावीत, असं अभ्यासकांना वाटतं. शिवाय एक भगिनी, माता, एक गरीब भगिनी अशा नावांनी हे लेखन प्रसिद्ध झालेले दिसते.
मुलीच्या लग्नाचे वय काय असावे यावर संमती वयाचा कायदा येऊ घातला होता. त्या कायद्याच्या निमित्तानेदेखील काही स्त्रिया व्यक्त झालेल्या दिसतात. ‘सुधारक’ या आगरकरांच्या पत्रात एक भगिनी लिहिते, ‘मुलीच्या लग्नाचे वय दहा ठेविले आहे. असली अर्धीमुर्धी सुधारणा करून भागल्याचा आव आणणारे सुधारक, मी म्हणते या काळी उपयोगाचे नाहीत.’’ स्त्रिया आजूबाजूच्या घटनांवर विचार करत होत्या आणि निर्भीडपणे ते विचार शब्दांत मांडू पाहत होत्या हेच यांतून प्रकर्षानं समोर येतं.’
सामाजिक सुधारणा घडवू पाहणाऱया पुरुषांच्या तुलनेत हा आवाज काहीसा क्षीण असला तरी तो होता हे महत्त्वाचे.
(लेखिका समीक्षक, संपादक आहेत.)

























































