मनतरंग – ऑल राऊंडर

>> दिव्या सौदागर

स्वतचं मूल हे कसं ‘ऑल राऊंडर’ असेल या महत्त्वाकांक्षेपायी मुलांच्या भावनिक गरजांकडे लक्ष देत नाहीत. हे मुलांच्या भविष्यासाठी योग्य नाही हे पालकांनी वेळीच लक्षात घ्यावे.

सुजयला (नाव बदलले आहे) कॉर्पोरेट जगतामध्ये स्थिर होऊन जवळ-जवळ दहाएक वर्षे झाली होती. प्रामाणिकपणा, मेहनत आणि कामाप्रति निष्ठा यामुळे त्याच्या कंपनीमध्ये त्याला ओळखत होते. एक हुशार आणि जबाबदार आयटी तज्ञ अशी त्याने स्वतची प्रतिष्ठा कमावली होती. सुजयचा आणखी एक गुण म्हणजे नवनवीन आव्हानं स्वीकारणं. त्याचा हाच गुण ओळखून त्याच्या एका मित्राने (जो त्याचाच सहकारी होता) त्याला भागीदारीत स्वतचा व्यवसाय सुरू करण्याची कल्पना मांडली. नव्या आव्हानांना कायम तयार असणाऱया सुजयने त्याचा प्रस्ताव तत्काळ मान्य केला आणि त्या दोघांनीही सारासार विचार करून आपल्या कंपनीमध्ये राजीनामा देऊन नवीन व्यवसायाची सुरुवात केली.

ते दोघंही आयटी क्षेत्राशी संबंधित असल्यामुळे त्यांनी स्वतची डिजिटल मार्केटिंग कंपनी सुरू केली. सुजय स्वत तांत्रिकदृष्टय़ा हुशार असल्याने त्याने त्या बाजू व्यवस्थित सांभाळल्या. त्याचा मित्र त्याला उत्तम सहकार्य करत होता. त्याची सामाजिक कौशल्ये सुजयपेक्षा अधिक असल्याने त्याने ग्राहकांशी संवाद, मीटिंग्स अशा बाबी पार पाडल्या. हे सगळं सहा महिने व्यवस्थित चालू असतानाच नेमकं त्याला वैयक्तिक कारणामुळे कंपनीतून काही काळासाठी बाहेर राहावं लागलं. त्यांची टीम तयार होत होती. मात्र त्या दोघांनी नुकतीच शिकून आलेली, कमी अनुभवी असलेली मुलं आपल्या टीममध्ये घेतली होती. त्यामुळे साहजिकच सगळा भार सुजयवर आला आणि त्यातूनच सुजयची समस्या सुरू झाली. सामाजिक कौशल्यांमध्ये सुजय तितकासा प्रभावी नव्हता. पहिल्यापासून मितभाषी, काहीसा गंभीर असा त्याचा स्वभाव होताच. त्यामुळे त्याच्या मित्राची कामं त्याच्याइतकी कौशल्याने त्याला जमत नव्हती. झालं. हे एक कारण सुजयला सतावू लागलं. स्वतच्या अविकसित कौशल्याच्या बाबतीत अधिकाधिक विचार करायला लागला.

“मला प्रेझेंटेशन्स देताना, इतर क्लाएंट्सशी बोलताना आत्मविश्वासाची कमतरता जाणवायला लागली आहे.’’ समुपदेशनाला येताना सुजयचा हा कळीचा मुद्दा होता. “मला इतरांशी बोलताना गुडी गुडी राहता येत नाही, तसंच संवाद वाढवता येत नाहीत. मला वाटतं, त्यामुळे बिझनेस वाढवण्यासाठी मी कुठेतरी कमी पडायला लागलोय.’’ सुजय मनातला सल बोलून दाखवत होता. त्याचं समुपदेशन सुरू करण्याचं कारणही जरा गंभीर होतं. हल्ली तो चिडचिडा झालेला होता. स्वतच्या कमतरतेचा तो तासन्तास विचार करून क्रियाशक्ती बिघडवत चालला होता. त्याची सोपी, सहजसाध्य कामं, तांत्रिक बाबी तसंच मेल्सना उत्तरं देणं याही गोष्टींमध्ये सुजयच्या क्षुल्लक चुका होऊ लागल्या होत्या. हे सगळं त्याला कुठेतरी स्वतच्या कमीपणा जाणवून द्यायला लागलं होतं. त्यातच त्याच्या मित्राने त्याला फोन करून विचारण्याचा प्रयत्न केला तेव्हा सुजयच्या दबलेल्या नकारात्मक भावना उफाळून आल्या आणि दोघांचंही भांडण झालं. हे भांडण त्यांच्या टीमसमोर झालं आणि हेच सुजयला फार लागलं.

“मी माझ्या पार्टनरला नको ते बोलून गेलो. आता मला खूप गिल्टी वाटतंय.’’ सुजयच्या बोलण्यातून पश्चात्ताप जाणवत होता. तो पटकन म्हणाला, “मी सगळ्याच बाबतीत परफेक्ट का नाही? त्यामुळे मला सतत घरीही बोललं जातंय. लहानपणापासून.’’ असं तो बोलून गेला.

“लहानपणापासून म्हणजे?’’ असं सुजयला विचारणं हे क्रमप्राप्त होतं. कारण बहुधा त्याच्या लहानपणामध्येच त्याच्या आताच्या समस्येचं मूळ दडलेलं होतं. हुशार आई-बाबांचा हुशार मुलगा अशी त्याची ओळख त्याच्या नातेवाईकांमध्ये होती. याचं कारण त्याचे पालकच होते. त्याच्या हुशारीची चुणूक त्याच्या मार्कांमध्ये दिसायला लागल्यावर त्यांनी त्याची प्रसिद्धी केली. त्याचे वडील हे स्वत ‘ऑल राऊंडर’ होते. त्यामुळे त्यांचा प्रभाव त्याच्यावर होताच. मात्र आतापर्यंत त्याला हवं ते आणि पाहिजे तसं मिळत गेल्याने त्याला त्याच्या मर्यादांची जाणीव कधी झालीच नाही. त्याने निवडलेलं कार्यक्षेत्र आणि त्याचं व्यक्तिमत्त्व हे परस्परपूरक होते, पण जेव्हा त्याच्यावर सगळ्याच प्रकारची जबाबदारी घेण्याची वेळ आली तेव्हा त्याला त्याच्या मर्यादांची जाणीव झाली. सुजयसाठी हे ‘स्वत्वावर आघात’ होण्यासारखं होतं.

“मला कॉन्फिडन्टली बोलता आलं नाही हे त्यांनी खूपच सीरियसली घेतलं आणि सरळ मला सांगितलं की कम्युनिकेशन क्लासेस लाव, पण मला नाही जायचं आहे तिथे. मी कम्युनिकेट का करू शकत नाही हे त्यांना माहीतच नाही. मला स्वतच्या सोशल स्किल्स डेव्हलप करायच्या आहेत. पण सगळंच मी करत बसलो तर माझ्यावर किती बर्डन येईल. माझ्या बाबांना हे मान्यच नाही. त्यांचं पालुपद एकच. त्याला जमतं मग तुला का नाही? मी निराश झालोय आता त्याच्या प्रश्नांना उत्तरं देऊन.’’ सुजयचं व्यक्त होणं थांबत नव्हतं.

आजकालच्या दोन पिढय़ांमध्ये मोकळेपणा आलेला आहे. मात्र भावनिक दुरावा वाढत चाललाय हे खेदाने नमूद करावसं वाटतंय. याचं मुख्य कारण म्हणजे पालकांमध्येच असलेली भावनिक आणि सामाजिक असुरक्षितता. त्यामुळे स्वतचं मूल हे कसं ‘ऑल राऊंडर’ असेल या महत्त्वाकांक्षेपायी मुलांच्या भावनिक गरजांकडे लक्ष देत नाहीत.

सुजयला मनस्ताप याचमुळे झालेला होता. कारणं इतर असली तरी मूळ गाभा हा त्याच्यावर पालकांकडून लादल्या गेलेल्या अपेक्षांचा होता. कठीण आव्हानांना तोंड देण्याची लढाऊ वृत्ती तो स्वतमध्ये घडवू शकत नव्हता. म्हणूनच त्याला सत्रांमध्ये ‘तो स्वत जरी परिपूर्ण नसला तरी जबाबदार मुलगा आहे.’ हे ठसवण्यात आलं. त्यासाठी त्याला त्याच्या लक्षात नसलेले असे अनेक कठीण प्रसंग ज्यातून तो बाहेर पडला होता हे आठवायला सांगितले. त्याला वाटणाऱया भीतीवर मात करण्यासाठी काही तंत्र शिकवली गेली ज्यायोगे त्याचे संवाद कौशल्य वाढीला लागले. हे सर्व करताना त्याला स्वतशी आत्मसंवाद आणि अपेक्षित परिणाम न दिसल्यास आत्मपरीक्षण या बाबीही शिकवल्या गेल्या.

सुजयने हे सगळं मनापासून केलं. शेवटी त्याला कुठेतरी माहिती होतं की, तो ‘ऑल राऊंडर’ नाही, पण यशस्वी उद्योजक तर नक्कीच होऊ शकत होता आणि हे जाणूनच तो पुन्हा जोमाने कामाला लागला.
(लेखिका मानसोपचारतज्ञ व समुपदेशक आहेत.)

[email protected]