
>> प्रसाद ताम्हनकर
सध्या जवळपास प्रत्येक जण कोणत्या ना कोणत्या स्वरूपात एआय तंत्रज्ञानाचा वापर करत आहे. येणारा काळ आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा असणार यात वाद नाही. मात्र याच्या तंत्रज्ञानात, त्याच्या व्याप्तीमध्येही महत्त्वपूर्ण बदल घडतील. ती लवचिकताही आपण अंगिकारली पाहिजे.
वर्ष 2025 हे पूर्णपणे तंत्रज्ञानाचे आणि खास करून आर्टिफिशियल इंटेलिजन्सचे वर्ष ठरले म्हणायला हरकत नाही. जगातील जवळपास सर्व महत्त्वाच्या तंत्रज्ञान कंपन्यांनी आपला मोर्चा AI तंत्रज्ञान आणि त्यातील भरभक्कम गुंतवणुकीकडे वळवलेला आपण पाहिला. या क्षेत्रात जगभरातून प्रचंड गुंतवणूक होत आहे आणि ती 2026 च्या मध्यापर्यंतदेखील कायम राहील अशी आशा आहे. आज जवळपास प्रत्येक जण कोणत्या ना कोणत्या स्वरूपात AI तंत्रज्ञानाचा वापर करत आहे. अगदी आपण सहजपणे हाताळत असलेला मोबाईल असो किंवा गुगलवर शोधलेली एखादी माहिती असो, या तंत्रज्ञानाने त्याच्या जाळ्यात आपल्याला पूर्णपणे गुरफटून टाकले आहे.
सर्वसामान्य माणसाला AI ची खरी ओळख पटली ती कोरोना महामारीच्या काळात. घरबसल्या मिळणाऱया स्वयंचलित सरकारी सूचना असोत किंवा फोनच्या माध्यमातून AI च्या मदतीने मिळणारा वैद्यकीय सल्ला असो, AI तंत्रज्ञान काय कमाल करू शकते हे हळूहळू सामान्य माणसाच्या लक्षात यायला लागले होते. कोरोना रुग्ण अथवा कोरोना बाधित असल्याची शंका असलेले लोक यांचे प्रत्यक्ष डॉक्टरांना न भेटता होऊ लागलेले निदान, AI तंत्रज्ञानावर आधारित रोबोट्स रुग्णांची करत असलेली वैद्यकीय तपासणी, AI तंत्रज्ञानावर आधारित स्वयंचलित गाडय़ा, विमानतळावरच्या सेवा अशी थक्क करणारी भरारी या तंत्रज्ञानाने अवघ्या काही काळात करून दाखवली.
सध्या अनेक क्षेत्रांत AI चा वापर वाढत आहे आणि भविष्यात तो इतरही अनेक क्षेत्र आपल्या कह्यात घेणार आहे. AI तंत्रज्ञानाची योग्य माहिती असणारे आणि त्याला वापरू शकणारे लोक यांची मागणी वाढणार आहे, तर दुसऱया बाजूला एकाच प्रकारचे काम (रिपिटिंग वर्क), फोनवरील संभाषण, कमी कौशल्याची कामे, जिथे मानवी बुद्धीचा फार वापर करावा लागत नाही अशी कामे माणसांकडून AI तंत्रज्ञान जोमाने हिसकावून घेण्याची शक्यता आहे. टेलिकॉलिंग, निगराणी, डाटा एंट्री, भाषांतर अशा अनेक क्षेत्रांतील मानवी वापर मोठय़ा प्रमाणावर कमी होण्याची शक्यता आहे.
सध्या AI तंत्रज्ञान हे मोठय़ा प्रमाणावर मानवी बुद्धीच्या मदतीने हाताळले जात आहे. मात्र भविष्यात हे तंत्रज्ञान पूर्णपणे स्वयंचलित होणार आहे. मशीन लर्निंग, सेल्फ लर्निंग अशा विविध पद्धतीने हे तंत्रज्ञान स्वतची बुद्धिमत्ता, निर्णय घेण्याची क्षमता आणि कौशल्य याचा वेगाने विकास करत राहणार आहे. या क्षेत्रात सतत बदल होत राहणार आहेत आणि त्यामुळे या क्षेत्रात काम करणाऱया प्रत्येकाला स्वतला सतत अपडेट ठेवावे लागणार आहे. हे तंत्रज्ञान जश्या काही नोकऱया कमी करणार आहे तशा विविध क्षेत्रांत अनेक नोकऱया उपलब्धदेखील करून देणार आहे. त्यामुळे उज्ज्वल भविष्याची स्वप्ने बघणाऱयांसाठी हे क्षेत्र प्रचंड महत्त्वाचे ठरणार आहे.
भविष्यात या तंत्रज्ञानाची मागणी अनेक महत्त्वाच्या क्षेत्रांत वाढत जाणार आहे. आरोग्य, विज्ञान, तंत्रज्ञान, नागरी सुविधा, वित्त क्षेत्र, उत्पादन, मनोरंजन, क्रीडा, कला, संरक्षण अशा क्षेत्रांत ही मागणी प्रामुख्याने वाढत जाणार आहे. AI तंत्रज्ञानाचा भविष्याचा वेध घेताना या क्षेत्रातील तज्ञांनी अनेक शक्यता वर्तवल्या आहेत. भविष्यात आरोग्य क्षेत्रात AI मुळे प्रचंड मोठी संधी निर्माण होणार आहे. अनेक दुर्लभ रोगांवर इलाज शोधण्यास मदत मिळणार आहे, कमी गुंतागुंतीच्या आणि सुलभ असणाऱया शस्त्रक्रियांबरोबर गुंतागुंतीच्या शस्त्रक्रियांमध्येदेखील AI ची प्रत्यक्ष मदत घेणे शक्य होणार आहे. या तंत्रज्ञानाची प्रगती बघता डॉक्टरकडे न जातादेखील अनेक रोगांची तपासणी व इलाज शक्य होणार आहे. मानवी आयुष्याची लांबी वाढवण्यात हे तंत्रज्ञान मोलाची मदत करणार आहे.
सध्या अनेक ठिकाणी ड्रोनच्या मदतीने शेती केली जात आहे, बियाणेदेखील पेरले जात आहे. येत्या काळात नांगरणीपासून ते बियाणे रोवणे, पाणी देणे, खत फवारणी ते थेट पिकाची कापणी करणे अशा सर्व गोष्टी AI तंत्रज्ञानावर आधारित ड्रोन्सच्या मदतीने शक्य होणार आहेत. संरक्षण दलात थेट सैनिकांचा वापर न करता AI आधारित ड्रोन्स, मिसाइल्स, हत्यारे चालवू शकणारे रोबोट्स यांचा वापर वाढणार आहे आणि सैनिकांची होणारी हानी कमी होत जाणार आहे. या तंत्रज्ञानाच्या मदतीने गर्दीवर नियंत्रण ठेवणे, योग्य त्या सूचना देत गर्दीचे व्यवस्थापन करणे, पाणी अथवा अश्रूधूराचा वापर करणे सहजसाध्य होणार आहे.
AI तंत्रज्ञानाच्या मदतीनं स्वयंशिक्षणाचे प्रमाण मोठय़ा प्रमाणावर वाढते आहे. कोणताही शिकवणी वर्ग न लावता आपण संगीतापासून ते पाककलेपर्यंत आणि कोडिंगपासून गुंतवणुकीपर्यंत अनेक विषयातले ज्ञान सहजपणे मिळवू शकत आहोत. या क्षेत्राचादेखील प्रचंड वेगाने विस्तार होणार आहे. मनोरंजन क्षेत्रात लिखाणापासून ते संगीत तयार करण्यापर्यंत अनेक ठिकाणी सध्या AI चा वापर केला जातो. भविष्यात या तंत्रज्ञानाच्या मदतीने संपूर्ण कलाकृती तयार करणे शक्य होणार आहे. गुंतवणुकीच्या क्षेत्रात तर AI तंत्रज्ञान जादूचा दिवा ठरणार आहे. गुंतवणुकीचे योग्य सल्ले देणे, तुमच्या पैशाचे योग्य नियोजन, स्वबुद्धीने तुमच्यासाठी शेअर ट्रेडिंग करणे अशी अनेक महत्त्वाची कामे AI तुमच्यासाठी करणार आहे.
मनोरंजनाबरोबरच AI तंत्रज्ञान हे भविष्यात एकाकी पडलेल्या अनेक वृद्धांचा, निराशेने ग्रासलेल्या लोकांचा मोठा आधार बनू शकणार आहे. भविष्यात या तंत्रज्ञानावर आधारित असलेले रोबोट्स माणसांची सोबत करतील, त्यांच्याशी गप्पा मारतील, सांगितलेली लहानसहान कामे करतील, निराश अवस्थेत गेलेल्या लोकांना योग्य तो सल्ला देतील, त्यांचे मनःस्वाथ्य सुधारण्यासाठी मदत करतील आणि त्यांना भावनिक आधार देतील. येत्या काही काळात एखादा सच्चा AI मित्र तुमच्याही घरात येऊन राहू लागला तर आश्चर्य नाही!
(लेखक माहिती तंत्रज्ञानाचे तज्ञ आहेत.)

























































