वेधक- आंब्याच्या बाटा साठवा आणि तेल गोठवा

>> दुर्गेश आखाडे

पिकलेला आंबा  कापला की, प्रत्येकाला आंब्याची मधाळ-रसाळ बाट खायला आवडते. आंबा खाऊन झाला की, आपण बाट सहजपणे फेकून देतो. टाकाऊतून टिकाऊ या उक्तीप्रमाणे फेकून दिलेल्या आंब्याच्या बाटांचा पुनर्वापर करत त्यापासून तेलनिर्मिती  करण्याचा यशस्वी प्रयोग राजापूर तालुक्यातील खडकवली गावच्या डॉ.ऋषीकेश गुर्जर यांनी केला आहे. आंब्याच्या बाटांपासून तयार केलेले तेल अन्न पदार्थांसाठी उपयुक्त आहे. सौंदर्यप्रसाधन उद्योगासाठी पूरक घटक ठरणार आहे. आमरस, आमसुले, आंबा वडी, लोणचं याबरोबरच आता बाटांपासून तेलही मिळणार आहे. त्यामुळे आता आंब्याच्या बाटा साठवा आणि तेल गोठवा हा नवा प्रक्रिया उद्योग कोकणात उभा राहणार आहे.

डॉ.ऋषीकेश गुर्जर यांच्या नावीन्यपूर्ण उपक्रमामुळे फेकून देण्यात येणाऱया बाटांचा पुनर्वापर करून नवा उद्योग कोकणात उभारता येणार आहे. बाटांपासून तयार करण्यात येणाऱ्या तेलाचा वापर अन्नपदार्थांत, सौंदर्यप्रसाधनात करता येतो. यातील घटक हे त्वचेसाठी उपयुक्त असल्याने त्वचेच्या औषधांमध्ये त्याचा वापर होणार आहे.

डॉ.ऋषीकेश गुर्जर हे सध्या रत्नागिरीतील गद्रे मरीन कंपनीत काम करतात. मात्र लहानपणापासून प्रयोगशील वृत्ती असल्यामुळे फेकून देण्यात येणाऱया आंब्याच्या बाटांपासून तेल निर्मिती करण्यासाठी त्यांनी चार वर्षे प्रयोग केले. त्यामध्ये त्यांना यश आल्यानंतर त्यांनी हा प्रयोग इतरांना सांगायला सुरुवात केली. आज रत्नागिरीत तिघांनी आंब्याच्या बाटांपासून तेल निर्मितीचा प्रकल्प हाती घेतला आहे आणि त्यांचा सल्लागार आणि प्रशिक्षक म्हणून डॉ.ऋषीकेश गुर्जर काम करत आहेत.

डॉ. गुर्जर यांनी आंब्याच्या बाटांपासून तेल निर्मिती करून बाटांपासून तेल निर्मितीसाठी विभक्त प्रक्रिया (सॉल्व्हेंट एक्स्ट्रक्शन) आणि प्रचंड दाबाचा (कोल्ड प्रेस) वापर करण्यात आला आहे. या प्रक्रियेत कण आकार (1-5 मिमी), द्रावक प्रकार (एन-हेक्साने आणि पेट्रोलियम इथर) आणि निष्कर्षण वेळ (90 मिनिटे) हे घटक विचारात घेण्यात आले. प्रक्रियेअंती विभक्त प्रक्रिया पद्धतीमध्ये सर्वाधिक तेल मिळाल्याची माहिती डॉ. गुर्जर यांनी दिली.