
>> डॉ. मंजिरी भालेराव
नाणेघाट म्हणजे कोकणातून सह्याद्री पर्वत पार करून देशावर येण्यासाठीचा महत्त्वाचा प्राचीन व्यापारी मार्ग. जिथे नाण्यांची सतत देवाणघेवाण चालत असावी म्हणून याला `नाणेघाट’ हे नाव दिले असावे. या मार्गावर सातवाहनकालीन लेणी तसेच कोरीव टाकी पाहायला मिळतात. नाणेघाटाच्या या शैलगृहातील नावासकट असलेल्या प्रतिमांचे महत्त्व अनन्यसाधारण आहे.
महाराष्ट्रातील आद्य राजघराणे म्हणून सातवाहन घराणे सुप्रसिद्ध आहे. या घराण्याचे नाव कायमचे जोडले गेले आहे ते म्हणजे नाणेघाट या प्राचीन व्यापारी मार्गाशी. नाणेघाट म्हणजे कोकणातून सह्याद्री पर्वत पार करून देशावर येण्यासाठीचे जे विविध मार्ग होते त्यापैकी एक. जिथे नाण्यांची सतत देवाणघेवाण चालत असावी म्हणून याला परंपरेने `नाणेघाट’ हे नाव दिले असावे. आज पुणे व ठाणे जिह्यांच्या सीमेवर जुन्नर तालुक्यात जुन्नरच्या वायव्येस सुमारे 28 किमीवर हा घाट आहे. तो पायी पायी किंवा प्राण्यांच्या मदतीने पार करावा लागतो.
साधारणपणे 2200 वर्षांपूर्वी युरोपमधून येणारा व्यापारी माल मुंबई आणि मुंबईच्या उत्तरेस भडोच, सोपारा तसेच कल्याण व चौल या बंदरांत येत असे. सोपारा येथे येणारा व्यापारी माल विविध घाट मार्गांनी देशावर येत असे. नाशिकजवळील आज `कसारा’ नावाने प्रसिद्ध असलेला घाट हा महाराष्ट्रातील उत्तरेकडील महत्त्वाचा घाटमार्ग होता. त्यानंतर नाणेघाट हा अतिशय महत्त्वाचा व्यापारी मार्ग होता. प्रवासी देशावरून कोकणात ये-जा करण्यासाठी याचा वापर करत असत. घाटाची चढण संपवून जुन्नरकडे यायला लागले की, तिथे एक दगडी रांजण आहे. तो जकात गोळा करायला वापरत असत, असे स्थानिक परंपरा सांगते.
नाणेघाट येथे एक नैसर्गिक खिंड आहे. बसाल्ट या ज्वालामुखीजन्य खडकाच्या डाईक या प्रकारामुळे याचे चौकोनी आकाराचे तुकडे होतात. त्यामुळे या दगडातच पायऱया तयार करणे सोपे झाले. पुढे ही खिंड मोठी करून इथे हा व्यापारी मार्ग तयार केला. मुंबईहून येताना घाटाच्या पायथ्याशी `प्रधानपाडा’ आणि `वैसाखरे’ नावाची दोन छोटी खेडी आहेत. प्राचीन काळी व्यापारी हा घाट चढायच्या आदल्या दिवशी कदाचित या गावात (म्हणजे प्रधानाचे गाव किंवा मुख्य गाव म्हणजे `प्रधानपाडा’ तसेच `वैश्यगृह’ किंवा `वैसाखरे’ म्हणजे वैश्य किंवा वाणी यांचे गाव) मुक्काम करून सकाळी इथून त्यांच्या प्रवासास सुरुवात करत असावेत.
थोडी चढण चढल्यावर एक पठारी प्रदेश लागतो. स्थानिक लोक त्याला `शिंगरूचे पठार’ म्हणतात. या परिसरात मध्ययुगीन बांधकामाचे काही अवशेष आहेत तसेच एक बांधीव विहीरसुद्धा आहे. सह्याद्रीच्या पोटातील या मार्गाने जात असताना काही छोटीशी लेणी तसेच कोरीव टाकीही पाहायला मिळतात. प्राचीन काळी जे व्यापारी या मार्गाने जात असत त्यांच्या विश्रांतीसाठी आणि त्यांना पाणी पिण्यासाठी केलेली ती सोय होती. काही टाक्यांवर लेखही पाहायला मिळतात.
मुख्य लेण्यांत सातवाहन वंशातील राजांचे व त्यांच्या कुटुंबातील काही लोकांच्या भग्न झालेल्या प्रतिमांचे अवशेष असून त्या प्रतिमांच्या वरील बाजूस त्यांची नावे कोरलेली आहेत. सिमुक सातवाहन, देवी नागनिका, राजा सिरी सातकर्णी, कुमार भाय, महारठी त्रणकयिर, कुमार हकुसिरी आणि कुमार सातवाहन यांची नावे त्यांच्या त्यांच्या भग्न पुतळ्यांच्या वर पाहायला मिळतात. यामध्ये सिमुकाचा धाकटा भाऊ कृष्ण किंवा कन्ह याचा पुतळा नसणे हे सातकर्णी आणि त्याच्या काकामधले ताणलेले संबंध सूचित करतात असे अभ्यासकांना वाटते. तसेच महारठी त्रणकयिर हा नागनिकेचा पिता असावा आणि त्याचे अस्तित्व या सर्व सातवाहन घराण्याच्या प्रतिमांबरोबर असणे हे त्याचे तेव्हाचे महत्त्वाचे स्थान सूचित करत असावे असेही अनेक अभ्यासकांचे मत आहे. लेखात राणीचा उल्लेख `मासोपवासिनी’ आणि `चरितब्रह्मचर्या’ असा आल्याने त्या वेळेस तिचा पती जिवंत नव्हता असे मत काही अभ्यासकांनी मांडले, तर ज्यांचे ज्यांचे पुतळे आहेत ते सर्व जण हे तयार करायच्या वेळेस मृत झाले होते असे मत काही अभ्यासकांनी मांडले आहे. भारतात जिवंत व्यक्तीचे पुतळे किंवा प्रतिमा करायची परंपरा नव्हती. त्यावरून हा अंदाज केला आहे.
अशा प्रकारच्या प्रतिमागृहांचे प्राचीन काळातील फारसे पुरावे आढळत नाहीत, पण या विधानाला दोन अपवाद आहेत. पहिला अपवाद म्हणजे मथुरा येथील `माट’ या भागाच्या परिसरात अपघाताने सापडलेले कुषाण राजांचे प्रतिमागृह आणि दुसरा म्हणजे सुप्रसिद्ध संस्कृत कवी भास याचे `प्रतिमा’ नावाचे नाटक. पहिला पुरावा हा कुषाण घराण्यातील राजांचे मोठे पुतळे आणि त्याबरोबरच इतरही काही लोकांचे तुटलेले पुतळे या स्वरूपाचा आहे. ते एका मोठय़ा सभागृहात सापडले. त्यातील अनेकांची डोकी तुटली होती, पण त्या प्रतिमांच्या पायाशी किंवा वस्त्रावर त्यांची नावे लिहिली असल्याने ती प्रतिमा कोणाची आहे, हे सहज ओळखू आले. कुषाण राजा विम तक्षम, देवपुत्र कनिष्क असे ते राजे होते. तसेच भासाच्या `प्रतिमा’ या नाटकात इक्ष्वाकू कुळातील मृत राजांच्या प्रतिमागृहाचा उल्लेख पहावयास मिळतो.
याव्यतिरिक्त प्राचीन भारतात इतर कुठेही प्रतिमागृहाचे उल्लेख अथवा पुरावे मिळालेले नाहीत. त्यामुळे नाणेघाटाच्या या शैलगृहातील या नावासकट असलेल्या प्रतिमांचे महत्त्व अनन्यसाधारण आहे. मौर्य घराण्याच्या सत्तेनंतर महाराष्ट्राच्या राजकीय इतिहासाचा सुरुवातीचा कालखंड अभ्यासताना या पुराव्याचे वेगळे महत्त्व लक्षात घेतले पाहिजे. मौर्य घराण्याच्या अंतानंतर सातवाहनांचा उदय होईपर्यंत मौर्यांच्या सैन्यातील लहान लहान प्रांताधिकारी किंवा पदाधिकारी हे विविध भागांत स्वतंत्र होऊन राज्य करत होते, आपली नाणी पाडत होते, हे डॉ. शैलेंद्र भंडारे यांनी केलेल्या नाण्यांच्या अभ्यासातून सिद्ध झाले आहे. त्यापैकी एक म्हणजे महारठी. त्यांच्याशी झालेल्या वैवाहिक संबंधांमुळे सातवाहन हे घराणे हळूहळू मोठे बनले. त्यांच्या या नात्याचा अत्यंत महत्त्वाचा पुरावा या शैलगृहातील लेखांनी जपून ठेवला आहे. खुद्द नाणेघाट, त्याचे महत्त्व आणि या शैलगृहातील मुख्य लेख तसेच या सर्वांच्या अस्तित्वाचे इतर आयाम पुढच्या लेखात पाहू या.
(लेखिका टिळक महाराष्ट्र विद्यापीठ, पुणे येथे संस्कृत व भारतीय विद्या अध्ययन केंद्राच्या विभागप्रमुख आहेत.)

























































