
>> शुभांगी जोशी
धुंदुर्मासात भल्या पहाटे उठून विठुरायाला नैवेद्य दाखवायची फार प्राचीन परंपरा पंढरपुरात आहे. निसर्गाशी जवळीक साधत नैवेद्याच्या ताटात या मोसमात आलेली फळे, हिरव्यागार भाज्या, शेतातून आलेले धनधान्य विठ्ठलाला अर्पण करण्याचा हा एक सोहळाच आहे.
धुंदुर्मासाला धनुर्मास असेदेखील ओळखले जाते. सूर्य ज्या वेळेला धनु राशीत असतो, त्या महिन्याला `धुंदुर्मास’ म्हणून ओळखले जाते. या महिन्यात भल्या पहाटे उठून देवाला नैवेद्य दाखवायची फार प्राचीन परंपरा पंढरपुरात आहे. धुंदुर्मासाला प्रारंभ झाला आहे. या काळात नैवेद्याच्या ताटात या मोसमात आलेली फळे, हिरव्यागार भाज्या, शेतातून आलेले धनधान्य विठ्ठलाला अर्पण करण्याचा सोहळा असतो.
पांडुरंगाच्या न्याहरी आणि महानैवेद्याचा थाट पहाटे पांडुरंगाला उठवताना त्याच्या डोळ्याला व तोंडाला पाणी लावून त्याला जागे केले जाते. जागा झाल्यावर लगेचच बेसनाच्या लाडवाचा नैवेद्य दाखवला जातो. त्यानंतर काकडा केला जातो. काकडय़ानंतर सकाळी सहा वाजता उजाडायच्या वेळेस देवाला जेवणाचा नैवेद्य दाखवला जातो. विठू माऊलीचा नैवेद्य म्हणजे त्याचा थाट खासच असणार ना. प्रचंड थंडीत शरीराला ऊब मिळावी असेच पदार्थ या नैवेद्याच्या पानात असतात. मुगाची खिचडी, तूप, लोणी, बाजरीची भाकरी, लिंबाचे लोणचे, वांग्याची भाजी, शेंग चटणी, दही वाटी, पापड, बासुंदी, तिळाची पोळी, शेंगदाण्याची पोळी, उडदाचा लाडू असा पौष्टिक नैवेद्य देवाला दाखवला जातो. पूर्वी बारसावडे, कटेकर, परिचारक, बडवे हे परिवार देवाला हा नैवेद्य महिनाभर दाखवत असत. देवाला दाखवून झालेला नैवेद्य घरी आल्यावर अंगत पंगत करून पाहुणेमंडळी, गावातील मित्रमंडळी, वारकरी भाविक एकत्र प्रसाद म्हणून ग्रहण करीत असत. सकाळी 11 वाजता महानैवेद्यात चटणी, कोशिंबीर, लिंबू, वरण-भात, साखर भात, पंचपक्वान्ने, कढी, उपलब्ध पालेभाज्या, भजी, कोथिंबीर वडी, तुपाची वाटी असा बेत असतो. धुपारतीच्या वेळी पेढे, सायभात, करंजी, मोदक, वाटीभर साय-साखर, दहीभात असा पौष्टिक नैवेद्य दाखवला जातो. मात्र श्री विठ्ठल मंदिर 2014 मध्ये शासनाच्या ताब्यात गेल्यावर मानकऱयांकडून या खाद्यसेवा बंद करण्यात आल्या. आता देवळाच्या स्वयंपाकगृहातच संपूर्ण नैवेद्य तयार करण्यात येतो.
थंडीकरिता विठुमाऊलीचा खास पोशाख थंडीचा तडाखा असल्याने पांडुरंगाला नेहमीच्या पोशाखाशिवाय अंगावर शाल कानपट्टी रोज बांधली जाते. ही कानपट्टी कार्तिकी पौर्णिमेपासून ते वसंत पंचमीपर्यंत बांधली जाते. पांढरी सुती करवतकाठी उपरण्याची ही कानपट्टी असते. याची लांबी सुमारे अडीच मीटर असते. शेजारती झाल्यावर पांडुरंगाला रजईने गुंडाळले जाते. शेजारतीच्या वेळीही चार बेसन लाडू नैवेद्यात असतात. त्याबरोबर शेजघरात पांडुरंगाला एक पेला दूध, एका डब्यात शिरा असा अल्पोपहार रात्रभर ठेवला जातो. दुसऱया डब्यातील शिरा आलेल्या भाविकांना वाटला जातो. थंडीमुळे सर्दी, खोकल्याची बाधा होऊ नये म्हणून डाळे आणि ओले खोबरे नैवेद्यात असते. हे ओले खोबरे किसून आणण्याचा मान निंबाळकरांचा होता. जसा पांडुरंगाला हा नैवेद्य दाखवला जातो. तसेच श्रीविष्णूपदावर पहाटे विष्णुसहस्त्रनामाचा पाठ करून शिरा आणि खिचडीचा नैवेद्य दाखवला जातो. पंढरपुरातील अनेक भाविक अशा प्रकारचा नैवेद्य तयार करून पहाटेच्या वेळी मुख्य मंदिरापासून चार किलोमीटरवर असलेल्या विष्णू पदावर येऊन हा नैवेद्य दाखवतात.
गावकऱयांचा रोजच्या सेवेतला सहभाग पांडुरंगाच्या धुंदुर्मासातील सेवेत गावकऱयांचा सहभागही असायचा. दुपारी 4 वाजता विठ्ठलाचा पोशाख झाल्यानंतर रस्त्यावरून नामदेव पायरीपासून ते महाद्वार घाटापर्यंत देवळाचा सेवेकरी एक फेरी मारायचा. या फेरीत लाडांच्या दुकानातून सुगंधी तेल. कवठेकरांकडून अत्तर व बुक्का. देशपांडय़ांकडून पेढे. दुतर्फा असलेल्या दुकानांमधून उदबत्ती, कुंकू. माळी समाजाकडून हार व तुळशी पत्रे फुले. तेली समाजाकडून तेल असं सर्व साहित्य गोळा करून देवळात आणले जाई. या प्रत्येक व्यक्तीचा सहभाग म्हणून या गोष्टी देवाला अर्पण केल्या जायच्या. गवळी समाजाकडून रात्रीच्या धारा काढून झाल्यानंतर निरश्या दुधाचा पेला देवाजवळ ठेवला जायचा.
मानवी आयुष्याला साजेशी अशी ही देवाची नित्यकर्मे, जी खाद्यसंस्कृतीतील गोडवा जपत आहेत. यामुळेच इतरत्र धुंदुर्मास थोडासा विस्मरणात गेला असला तरी पंढरपूरच्या सांस्कृतिक जीवनाचा तो आजही एक अविभाज्य घटक आहे.

























































