परीक्षण – साहिर…एक न संपणारा शब्दांचा जादूगार

>> अरविंद दोडे

एखाद्या संवेदनशील प्रतिभावंताचं जीवन आणि लेखन फारसं वेगळं नसतं. दुर्दैवाशी दोन हात करताना कलावंताची जडणघडण ही जनसामान्यांच्या लहरी स्वभावापेक्षा वेगळी होत असते. आघाडीवर कर्तव्य बजावणारा लष्करी जवान ज्या दुर्दम्य ओघरी येतो, त्याच ओआपल्या आईशी साहिर कायम वागत राहिले होते. फाळणी हा जसा माणुसकीला लागलेला ऐतिहासिक कलंक आहे, तसाच पाकिस्तानातून हिंदुस्थानात आलेल्या कलाकारांनी संगीत, अभिनय आदी कलांच्या क्षेत्रात गाजवलेला इतिहास सर्वश्रुत आहे. साहित्याच्या बाबतीतही अशाच विलक्षण नोंदी आहेत. त्यात साहिर हे शीर्षस्थानी आहेत, हे कुणीही मान्य करेल. ‘साहिर… एक शब्द गारुड’ हे पुस्तक वाचताना वरील विधानाचा प्रत्यय वाचकांना येतो.

‘साहिर’ हे केवळ शायर नव्हते, तत्वज्ञ, विचारवंत आणि लहरी प्रज्ञावंत होते. बी आर चोपरा, यश चोपरा, देव आनंद आणि त्याचे बंधू अशा अनेक दिग्गज कलावंतांनी हिंदी चित्रपटसृष्टी गाजवली, समृद्ध केली. साहिर यांचा जन्म 1921 मध्ये लुधियाना येथे झाला आणि ते 1980 मध्ये हे जग सोडून गेले. 1951 मध्ये ‘नौजवान’ या चित्रपटासाठी  लिहिलेलं ‘ठंडी हवाएं लहराके आये, रुत है जवां तुमको यहाँ कैसे बुलाए’ हे गाणं तुफान गाजलं आणि तेव्हापासून त्यांचा गीतप्रवास सुरू झाला. त्यांनी लोकप्रियतेचं शिखर कसं गाठलं? या प्रश्नाचं उत्तर म्हणजे हे अभ्यासपूर्ण पुस्तक आहे. शुभांगी खरे यांनी साहिर यांच्या लोकप्रियतेचा आलेख रेखाटताना असंख्य आठवणी थोडक्यात सांगितल्या आहेत. त्यामध्ये साहिरचे प्रगतशील विचार, श्रीमंत बापाचा बंडखोर मुलगा, संगीतकारापेक्षा जास्त रॉयल्टी घेणारा पहिला गीतकार, शांतीचा शायर अशा कितीतरी पैलूंनी साहिर लोकप्रिय आहेत. प्रस्तुत लेखिका अशा अनेक विशेषणांवर भाष्य करते. सुमारे 24 चित्रपट, त्याचे संगीतकार, निर्माते, दिग्दर्शक आणि कलाकार यांच्या आठवणी सांगताना साहिर यांचे श्रेष्ठत्व सांगितलं आहे. समकालीन व्यक्तींबरोबर झालेले तात्विक मतभेद हेदेखील हृदयस्पर्शी आहेत. ‘हम दोनो’ (1961)  पासून ते ‘त्रिशूल’ (1978) पर्यंतच्या गीतांचा सिलसिला या पुस्तकात घेण्यात आला आहे. तसेच साहिर यांच्या गाण्यांचा रसास्वाद घेताना त्यातील सुंदर, लक्षवेधी बारकावे नमूद केले आहेत. गीत आणि भावकविता यांच्या सीमारेषा आधुनिक काळापर्यंत अस्पष्ट होत्या.

चोप्रा कॅम्पचे ‘वक्त’ आणि ‘हमराज’ हे दोन सिनेमे साहिरच्या गाण्यांमुळे प्रचंड गाजले. तसेच ‘द बर्निंग ट्रेन’ हादेखील साहिर यांच्या गाण्यांमुळे सुसह्य झाला. लेखिकेनं या बाबतीत पुष्कळ संदर्भ देऊन पूर्ण पुस्तक वाचनीय केले आहे. पुलेख आहे ‘नीलकमल’ चित्रपटावर. संगीतकार रवी आणि साहिर यांच्या असंख्य अमर गाण्यांपैकी ‘नीलकमल’ची गाणीदेखील अमर झाली. त्यातील मनाचा स्वभाव सांगणारं ‘तोरा मन दर्पण कहलाये’ हे गाणं, तर ‘बाबुलकी की दुवाए’ हे गाणं गाताना खुद्द रफीसाहेबदेखील अश्रू होते. या बिदाईच्या गाण्यात आणि त्यांच्या आवाजातदेखील मुलीच्या आठवणींनी व्याकूळ होऊन अश्रू जाणवतं. ‘चित्रलेखा’मधील बौद्ध तत्त्वज्ञान, ‘शगुन’मधील मंगळाच्या मुलीची तगमग, ‘मुझे जीने दो’, ‘नया दौर’, ‘फिर सुबह होगी’सारखे सामाजिक चित्रपट, ‘ताजमहाल’सारखा ऐतिहासिक चित्रपट, ‘बहुरानी’मधील कणखर स्त्राr अशा वेगवेगळ्या विषयांवरील सिनेमांची गाणी साहिर साहेबांच्या सिद्धहस्त लेखणीतून लोकप्रिय झाली.

प्राचीन काळात भावकवितेला संगीताचा आधार होता. ती वाद्यांवर गायली जात होती. नंतर गीत व भावकाव्य वेगवेगळं झालं. साहिर यांच्या बरोबर त्या त्या वेळी संगीतकारांनी अनेक नवीन स्वररचना लिहिल्या. त्यामध्ये गायक गायिकांनीदेखील सुरेल रंग भरले. त्यांच्या गीतांमध्ये आदर्शवाद, स्वप्नरंजन, स्मरणरंजन अशा प्रतिमा रंगवतानादेखील साहिरजींच्या रचना कशा हटके आहेत हे पुस्तक वाचताना जाणवतं. त्यांच्या गीतांमधून श्रद्धा, भावबंध, महत्त्वाकांक्षा, दिवास्वप्नं, जीवनआदर्श या गोष्टींसोबत समाजाचं रंजन करणं, उपदेश करणं आणि त्यापुजाऊन सत्कार्यासाठी प्रवृत्त करणं अशा भावभावनांचं प्रत्यकारक दर्शन घडतं. परंतु हे सर्व वाचून झाल्यानंतरदेखील प्रत्येक रसिक म्हणेल ‘अजून पुष्कळ बाकी आहे याचे अजून भाग येऊ द्यात.’

सुरभी खरे यांनी केलेले पुस्तकाचे मुखपृष्ठ आकर्षक आहे. शुभांगी खरे यांचं हे पहिलंच पुस्तक बहारदार आहे.

साहिर…एक शब्द गारुड

 लेखिका : शुभांगी खरे

 प्रकाशन : अनघा प्रकाशन, ठाणे.

 पृष्ठे : 118,  मूल्य : रु. 200/-