
साहित्यसंस्कृती अधिक समृद्ध करणारा सध्याचा काळ. या आठवडय़ाच्या शेवटी सातारा येथे 99वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन पार पडत आहे तर जानेवारी महिन्यात जयपूर लिटरेचर फेस्टिव्हल 2026 चे वेध लागले आहेत. राष्ट्रीय पातळीवरील हा महत्त्वाचा साहित्य महोत्सव ज्याला जगभरातील साहित्य वर्तुळातील दिग्गजांची उपस्थिती असते. हे या महोत्सवाचे 19वे वर्ष.
जयपूरमध्ये 15 ते 19 जानेवारी दरम्यान होणाऱ्या या महोत्सवात अनेक पुरस्कार विजेते आणि प्रसिद्ध लेखक वाचकांशी संवाद साधतील. ललित लेखनासाठी पुलित्झर पुरस्कार मिळवलेले व जेम्स या कादंबरीसाठी राष्ट्रीय पुस्तक पुरस्कार प्राप्त केलेले लेखक पर्सिवल एव्हरेट यांची उपस्थिती लक्षवेधी ठरणार आहे. या वर्षीच्या यादीत नोबेल पुरस्कारप्राप्त, बुकर पारितोषिक विजेते लेखक, सर्वाधिक वाचकपसंती असणारे भारतीय लेखक, इतिहासकार, कथालेखक अशा 350 वक्त्यांची उपस्थिती असणारी आहे.
आनंद नीलकांतन, अनुराधा रॉय, बानू मुश्ताक, भावना सोमाया, एडवर्ड ल्यूस, एलेनॉर बॅराक्लॉ, गोपालकृष्ण गांधी, हॅली रुबेनहोल्ड, हरलीन सिंग संधू, हेलन मोल्सवर्थ, जॉन ली अँडरसन, जंग चांग, ओलेन मॉल्सवर्थ बर्नर्स-ली, शोभा डे, स्टीफन फ्राय आणि विश्वनाथन आनंद या दिग्गजांच्या उपस्थितीवरून महोत्सवाच्या भव्यतेचा अंदाज येतो. म्हणूनच साहित्य जाणिवा अधिक सशक्त करणारा असा हा महोत्सव ठरत आहे.
























































