
काँग्रेस कार्यकारिणीची दिल्लीत महत्त्वाची बैठक झाली. या बैठकीत ‘मनरेगा बचाओ’चा नारा काँग्रेसने दिला आहे. येत्या 5 जानेवारीपासून ‘मनरेगा बचाओ’ ही देशव्यापी मोहीम राबवणार असल्याचा निर्णय काँग्रेसने घेतला आहे. तसेच महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी अधिनियम (मनरेगा) चे कुठल्याही स्थितीत रक्षण करणार, अशी आक्रमक भूमिका घेतली आहे. केंद्र सरकारने ‘मनरेगा’ रद्द करून ‘विकसित भारत जी राम जी’ हा नवीन कायदा आणला आहे. या कायद्याला काँग्रेसचा तीव्र विरोध आहे. आणि आता ‘मनरेगा बचाओ’ या देशव्यापी मोहीमेतून काँग्रेस रस्त्यावर उतरून आंदोलन करणार आहे.
‘मनरेगा’ ही कुठली योजना नाही करत हिंदुस्थानच्या संविधानाकडून मिळालेला कामाचा अधिकार आहे. ग्रामीण मजुरांचा सन्मान, रोजगार, मजुरी आणि वेळीच निधी देण्याच्या हक्कासाठी एकजुटीने संघर्ष करण्याचा संकल्प केल्याचे काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे म्हणाले. काँग्रेस कार्यकारिणीच्या बैठकीनंतर काँग्रेस अध्यक्ष खरगे, काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी काँग्रेस कार्यकारिणीच्या बैठकीत घेतलेल्या निर्णयांची माहिती खरगे यांनी दिली. ‘मनरेगा’मधून गांधीजींचे नाव मिटवण्यास आणि मजुरांचे अधिकार खैरातीत बदलण्याच्या प्रत्येक कटाचा लोकशाही पद्धतीने काँग्रेस विरोध करेल, असा इशारा खरगे यांनी दिला आहे. ‘मनरेगा’ वाचवण्यासाठी आणि मजुरांचे अधिकार वाचवण्यासाठी गावोगावी आवाज बुलंद करण्याचा संकल्प काँग्रेसने सोडल्याचे खरगे यांनी सांगितले.
‘मनरेगा’ ही योजना हक्कांवर आधारीत होती. ‘मनरेगा’मुळे देशात कोट्यवधी नागरिकांना किमान रोजगार मिळत होता. पण आता रोजगाराच्या अधिकारांवर हल्ला झाला आहे. दुसरे म्हणजे राज्यांच्या अधिकारांवरही गदा आली आहे. योजनेसाठी केंद्र सरकार राज्यांकडून निधी घेत आहे. आर्थिक आणि सत्तेचं केंद्रीकर होत आहे. यामुळे देशाचे नुकसान होईल. गरिबांना या धोरणाचा फटका बसणार आहे. त्यांना वेदना होतील, असे काँग्रेस नेते राहुल गांधी यावेळी म्हणाले.





























































