
थर्टी फर्स्ट आणि नववर्ष स्वागतासाठी होणाऱ्या पाटर्य़ांच्या पार्श्वभूमीवर पालिकेने मुंबईत गेल्या पाच दिवसांत तब्बल 1221 हॉटेल, बार, रेस्टॉरंट, पब आणि आस्थापनांमधील अग्निसुरक्षेची तपासणी केली. यामध्ये अग्निशमन यंत्रणा सुरू नसल्यामुळे 59 ठिकाणी कारवाई करण्यात आली तर 20 जणांना नोटीस बजावण्यात आली.
थर्टी फर्स्ट आणि नववर्ष स्वागतासाठी रेस्टॉरंट, बार आणि आस्थापनांमध्ये मोठय़ा प्रमाणावर पाटर्य़ांचे आयोजन करण्यात येते. मात्र अतिउत्साहात आणि अग्निशमन यंत्रणा नसल्यास या ठिकाणी दुर्दैवाने आग लागल्यास मोठी दुर्घटना होण्याची शक्यता असते. त्यामुळे पालिका आयुक्त भूषण गगराणी यांच्या आदेशानुसार अग्निशमन दलाच्या माध्यमातून मुंबईत 22 ते 26 डिसेंबर या कालावधीत विशेष अग्निसुरक्षा तपासणी मोहीम राबवली. यामध्ये अग्निशमन यंत्रणा ठप्प असलेल्या ठिकाणी कारवाई करताना बेकायदा सिलिंडर जप्त करणे, नोटीस बजावणे, अतिरिक्त बांधकाम असल्यास नोटीस देणे आदी प्रकारची कारवाई करण्यात आली.
अशी झाली कारवाई
अग्निशमन यंत्रणा नसल्यास ‘महाराष्ट्र आग प्रतिबंधक व जीवसंरक्षक उपाययोजना अधिनियम 2006’ च्या तरतुदींनुसार कारवाई करण्यात येत आहे. या कारवाईत 10 मॉल्स, 25 पंचतारांकित हॉटेल्स, 59 लॉजिंग-बार्ंडग, 19 रूफ टॉप, 148 पब, बार, क्लब, 12 पार्टी हॉल, 5 जिमखाना, 628 रेस्टॉरंट आदींची तपासणी करण्यात आली. दरम्यान, ‘विशेष अग्निसुरक्षा मोहीम’ 28 डिसेंबरनंतरही चालू राहणार असल्याची माहिती अतिरिक्त आयुक्त अश्विनी जोशी यांनी दिली.




























































