
पुण्यातील कुख्यात गुंड बंडू आंदेकर शनिवारी मोठी चमकोगिरी करीत महापालिका निवडणुकीचा अर्ज दाखल करण्यासाठी भवानी पेठेतील निवडणूक कार्यालयात आला. पोलिसांनी त्याला काळा बुरखा, हातात बेडय़ा आणि अक्षरशः दोरखंडाने बांधून आणले. उमेदवारी अर्ज भरताना त्याला मिरवणूक, भाषण किंवा घोषणाबाजी करण्यास न्यायालयाने बंदी घातली होती. मात्र कुटुंबासह आलेल्या आंदेकरने ‘लोकशाही’च्या घोषणा करीत सभ्यतेचा आव आणला. मात्र त्याने ‘अर्धवट’ अर्ज भरल्याने तो स्वीकारण्यात आला नाही. त्यामुळे पोलीस बंदोबस्तात आलेल्या आंदेकरची नुसतीच ‘हवा’ ठरली. तो सोमवारी अर्धवट राहिलेला अर्ज भरणार आहे. बंडू आंदेकर हा सध्या आयुष कोमकर हत्या प्रकरणात न्यायालयीन कोठडीत आहे.






























































