
महापालिका निवडणुकीची धामधूम सुरू असतानाच प्रभाग क्रमांक 16मधून निवडणूक लढविण्याची तयारी केलेल्या एका तृतीयपंथीयाचा लष्कर भागात खून करून सुमारे 45 तोळे सोने, मोबाईल, दुचाकी लंपास करण्यात आली आहे.
अय्यूब हुसेनसाब सय्यद (वय 40, रा. मुर्गी नाला, लष्कर भाग, सोलापूर) असे तृतीयपंथीयाचे नाव आहे. प्रभाग क्रमांक 16मधून निवडणूक लढवण्याची त्यांनी तयारी केली होती. पोलिसांनी घटनास्थळी भेट दिली असता, सीसीटीव्ही फुटेजमध्ये आढळलेल्या तीन तरुणांवर संशय व्यक्त केला जात आहे.
मुर्गी नाला येथे राहणारे अय्यूब हुसेनसाब सय्यद हे तृतीयपंथीय असून, घरात एकटेच राहत होते. दुपारी घरात ते मृतावस्थेत आढळलो. तोंडावर उशी दाबल्याने त्यांचा गुदमरून मृत्यू झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. त्यांच्या अंगावर सुमारे 40-45 तोळे सोने होते. कानातील दागिन्यांसाठी कानही ओरबाडण्यात आल्याची प्राथमिक माहिती पुढे आली आहे. गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावरून ते प्रभाग क्रमांक 16मधून निवडणुकीत उभे राहणार असल्याचा प्रचार करत होते.
दरम्यान, घटनेची माहिती मिळताच सदरबझार पोलीस स्टेशनचे पथक घटनास्थळी दाखल झाले. परिसरातील सीसीटीव्ही फुटेजमध्ये तीन तरुण संशयास्पद स्थितीत आढळले आहेत. सय्यद यांच्या अंगावरील 45 तोळे सोने लंपास झाले असून, त्यांचा खून चोरीच्या उद्देशाने की निवडणुकीवरून झाला, याबाबत तपास सुरू आहे.





























































