
नाताळचा सण आणि त्याला जोडून आलेला शनिवार व रविवारचा वीकेण्ड आणि नववर्षाच्या स्वागताची संधी साधत पश्चिम महाराष्ट्रातील देवस्थानांमध्ये भाविकांची अलोट गर्दी झाली आहे. पंढरपूर, कोल्हापूर, शनिशिंगणापूर, शिर्डी, अक्कलकोट येथे भाविकांनी दर्शनासाठी रांगा लावल्याचे चित्र आहे. भाविकांच्या अलोट गर्दीमुळे अनेक ठिकाणी वाहतूककोंडी झाल्याचे दिसून आले.
श्रीक्षेत्र शनिशिंगणापुरात वाहतूककोंडी
शनिशिंगणापुरात ख्रिसमसपासून भाविकांच्या गर्दीत वाढ होत आहे. शनिभक्तांमुळे शनिशिंगणापूर गजबजून गेले. आज शनिवार वीकेण्डमुळे हजारो भाविकांनी शनिमहाराजांचे दर्शन घेतले. आज पहाटेपासून शनिमंदिराकडे गर्दीचा ओघ सुरू होता. शिर्डीमार्गे येणाऱया भाविकांच्या वाहनामुळे ठिकठिकाणी वाहतूककोंडी झाली. सकाळी मंदिरात महाद्वारपासून दर्शनासाठी भाविकांच्या रांगा लागल्या. देवस्थानचे वाहनतळ हाऊसफुल्ल झाल्याने भाविकांनी खासगी
वाहनतळाचा आश्रय घेतला. दुपारी मध्यान आरती सोहळ्याला पन्नास हजारांहून अधिक भाविक दाखल झाल्याने दर्शन पथातील मार्गावरील दोन्ही बाजूने भाविकांच्या रांगा लागल्या. मंदिरात गर्दी झाल्याने रेटारेटी व काही प्रमाणात गोंधळ उडत गेला. दिवसभर गर्दी वाढत गेल्याने तीन लाख भाविक शनिशिंगणापूरमध्ये दाखल झाले होते. दरम्यान, सुप्रीम कोर्टाने देवस्थान पुन्हा शासनाच्या ताब्यात देऊन नाशिकचे आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम यांची प्रशासकपदी नियुक्ती केली आहे. त्यामुळे शुक्रवारी (दि. 26) डॉ. गेडाम शनी मंदिरात दाखल झाले. त्यांनी रात्रभर मंदिरात तळ ठोकून पहाटे मंदिर परिसराची गस्त घालून पाहणी केली.
शिर्डीनगरी झाली ‘साईमय’!
नवीन वर्ष 2026च्या स्वागतासाठी आणि सरत्या वर्षाला निरोप देण्यासाठी शिर्डी येथील श्री साईबाबा मंदिर पूर्णपणे सज्ज झाले आहे. सध्या शिर्डीमध्ये भाविकांचा जनसागर उसळला असून, संपूर्ण शिर्डीनगरी ‘साईमय’ झाली आहे. भक्तीच्या या महापुरात शिर्डीतील रस्ते, चौक आणि गल्लीबोळ भाविकांनी गजबजून गेले आहेत. 31 डिसेंबर रोजी साई मंदिर रात्रभर खुले राहणार आहे. साईबाबांच्या समाधी दर्शनासाठी भाविकांना तब्बल 6 ते 7 तास प्रतीक्षा करावी लागत आहे. वाढती गर्दी लक्षात घेता प्रशासनाने चोख नियोजन केले आहे. भाविकांची निवासव्यवस्था, दर्शनव्यवस्था, आरोग्य आणि सुरक्षेच्या दृष्टीने विशेष पथके तैनात करण्यात आली आहेत. साईबाबा संस्थानच्या वतीने 25 डिसेंबर 2025 ते 1 जानेवारी या दरम्यान आठ दिवसांचा विशेष महोत्सव साजरा केला जात आहे. या महोत्सवाचे मुख्य आकर्षण 30 डिसेंबर ते 1 जानेवारी या तीन दिवसांत पाहायला मिळणार आहे.
अक्कलकोटमध्ये अन्नछत्र मंडळाचे चोख नियोजन
सलग सुट्टय़ांमुळे अक्कलकोटमध्ये पुणे, मुंबईसह देश-विदेशातून भाविक दाखल झाले आहेत. या पार्श्वभूमीवर ‘न्यासा’चे संस्थापक अध्यक्ष जन्मेजयराजे विजयसिंहराजे भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली व कार्यकारी अध्यक्ष अमोलराजे जन्मेजयराजे भोसले यांच्या नेतृत्वाखाली अन्नछत्र मंडळाकडून येणाऱया भाविकांसाठी उत्कृष्ट नियोजन करण्यात आले होते. श्रीक्षेत्र अक्कलकोट येथील स्वामी समर्थांचे दर्शन व महाप्रसाद घेण्यासाठी श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळात गेल्या 10 दिवसांत 12 लाखांहून अधिक भाविकांनी महाप्रसादाचा लाभ घेतला आहे. सरत्या वर्षी भाविकांच्या गर्दीने उच्चांक गाठला आहे. पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली व उपविभागीय पोलीस अधिकारी विलास यामावर यांच्या नेतृत्वाखाली पोलीस निरीक्षक दीपक भिंताडे यांनी चोख पोलीस बंदोबस्त मंदिर व ‘न्यासा’च्या परिसरात लावण्यात आला होता.
श्री विठ्ठलाची पाद्यपूजा 31 डिसेंबरपर्यंत बंद
श्री विठ्ठल-रुक्मिणीच्या दर्शनासाठी आलेल्या भाविकांनी पंढरीनगरी गजबजली आहे. सहअध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर यांच्या मार्गदर्शनाखाली मंदिर समितीकडून जास्तीत जास्त भाविकांना दर्शन मिळावे म्हणून मंदिरातील पाद्यपूजा दि. 31 डिसेंबरपर्यंत बंद ठेवण्यात आली आहे. त्यामुळे भाविकांना जलद व सुलभ दर्शन मिळत असल्याने गर्दी वाढत आहे. दक्षिण काशी म्हणून प्रसिद्ध असलेल्या श्री विठ्ठल-रुक्मिणीच्या दर्शनासाठी राज्याच्या कानाकोपऱयातून हजारो भाविक दाखल झाले आहेत. श्री विठ्ठल-रुक्मिणीच्या दर्शनासाठी दर्शन रांग मंदिरापासून तीन कि.मी.पर्यंत गेली आहे. दर्शनासाठी तीन ते चार तासांचा कालावधी लागत आहे.





























































