
ठाणे महापालिका निवडणुकीत भाजप आणि शिंदे गटात आठ जागांवर युतीचे घोडे अडले आहे. जागावाटपासाठी होणाऱ्या त्यांच्या जोरबैठका निष्फळ ठरत आहेत. शुक्रवारी रात्री झालेली तिसरी बैठक आणि शनिवारी सायंकाळी झालेल्या चौथ्या बैठकीतही जागावाटपाचा कोणताही तोडगा निघाला नाही. सुचवलेल्या आठ जागा मिळाव्यात यावर ठाम राहात भाजपने शिंदे गटाला आता अखेरचा अल्टिमेटम दिला आहे.
भाजपने ठाण्यात सर्व 131 लढवण्याची तयारी केली. उमेदवारांची नावेही निश्चित केली आणि ती यादी त्यांनी पक्षश्रेष्ठींकडे पाठवली. त्यानंतर शिंदे गटाने कोणत्याही परिस्थितीत युती करायचीच आहे असे सांगत भाजपसोबत चर्चेचे गुऱ्हाळ सुरू केले. मंगळवारी रात्री उशिरा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या निवासस्थानी भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्यासोबत बैठक झाली, परंतु ती निष्फळ ठरली. त्यानंतर शुक्रवारी रात्री तिसरी बैठक झाली. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण, मंत्री उदय सामंत, आमदार निरंजन डावखरे, खासदार श्रीकांत शिंदे आणि नरेश म्हस्के यांच्यात चार तास खलबते झाली, परंतु ठाण्यातील १३१ जागांपैकी कोणी किती जागा लढवायच्या यावर अखेरपर्यंत एकमत झाले नाही. आज सायंकाळीही पुन्हा जोरबैठका झाल्या, परंतु निर्णयाविनाच बैठक संपली.
आम्ही मागितलेल्या जागांवरच चर्चा होईल ठाण्यातील बाळकूम प्रभागात दोन जागा, वैतीवाडी-लुईसवाडी प्रभागात एक जागा, वर्तकनगर – शिवाजीनगर प्रभागात एक जागा, पाचपाखाडी प्रभागात एक जागा, ओवळा प्रभागात एक जागा आणि कळव्यात दोन अशा एकूण आठ जागा मिळाव्यात यावर भाजप ठाम आहे. परंतु त्यांच्या गळ्यात मुंब्यातील काही जागा मारण्याची योजना शिंदे गटाने आखली होती. त्याला भाजपच्या नेत्यांनी स्पष्ट नकार दिला. शहरातील आम्ही मागितलेल्या महत्त्वाच्या जागांवरच चर्चा होईल, असे भाजप नेत्यांनी स्पष्ट शब्दात शिंदे गटाला सुनावले.
स्वबळावर लढण्यासाठी सज्ज रहा; कार्यकर्त्यांना संदेश
आज सायंकाळी उशिरा शिंदे गट आणि भाजपात पुन्हा जोरबैठका झाल्या, परंतु त्यातून कोणताही तोडगा निघाला नसल्याने भाजपने स्वबळावर लढण्यासाठी सज्ज व्हा, असा संदेशच कार्यकर्त्यांना दिला आहे.




























































