
नवी मुंबईच्या बिघडलेल्या हवेत सुधारणा करण्यासाठी महापालिका आयुक्त डॉ. कैलास शिंदे आता अॅक्शन मोडवर आले आहेत. त्यांनी शहरात सुरू असलेल्या अनेक बांधकाम प्रकल्पांना अचानक भेट दिली. त्यावेळी सिडकोच्या माध्यमातून उभारण्यात येत असलेल्या जुईनगर येथील गृहनिर्माण प्रकल्पावर प्रदूषणविषयी तयार करण्यात आलेल्या नियमांचे उल्लंघन केले जात असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. धूळ ओकणाऱ्या या सिडकोच्या प्रकल्पाला आयुक्तांनी नोटीस बजावली असून वायू आणि ध्वनिप्रदूषण कमी झाले नाही तर बांधकामाला स्थगिती देण्याचा इशारा दिला आहे. नवी मुंबईतील हवा गुणवत्ता निर्देशांक १४५ पर्यंत पोहोचला असल्याने नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे.
सिडकोच्या माध्यमातून वाशी आणि जुईनगर येथे पंतप्रधान आवास योजनेतील घरांचे काम सुरू आहे. याच बांधकाम साईटला महापालिका आयुक्त कैलास शिंदे यांनी अचानक भेट दिली. याप्रसंगी शहर अभियंता शिरीष आरदवाड हेही उपस्थित होते. त्यावेळी त्या ठिकाणी धुळीचे नियंत्रण करण्यासाठी कोणतीही उपाययोजना न केल्याचे निदर्शनास आले. बांधकाम करताना शासनाने काही नियम केले आहेत. या नियमावलीचेही सिडकोच्या साईटवर ठेकेदाराने उल्लंघन केले आहे. त्यामुळे आयुक्तांनी या प्रकल्पाला कारणे दाखवा नोटीस बजावली. त्यानुसार उपाययोजनांचा अहवाल सात दिवसांच्या आत द्यावा लागणार आहे.




























































