
नवी मुंबईतील कळंबोली परिसरातून मन सुन्न करणारी घटना समोर आली आहे. एका 30 वर्षीय आईने आपल्या सहा वर्षांच्या चिमुरडीची राहत्या घरात गळा दाबून हत्या केली. ही हृदयद्रावक घटना मंगळवारी रात्री घडली. सुरुवातीला मुलीचा मृत्यू हृदयविकाराच्या झटक्याने झाल्याचा बनाव रचणाऱ्या या मातेला पोलिसांनी अखेर बेड्या ठोकल्या आहेत. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात संतापाची लाट उसळली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, या चिमुरडीचा मृतदेह संशयास्पद स्थितीत आढळल्यानंतर तिच्या वडिलांनी तिला तातडीने जवळच्या रुग्णालयात दाखल केले. मात्र, डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले. चौकशीदरम्यान आईने वारंवार मुलीचा मृत्यू आजारपणामुळे किंवा हृदयविकाराच्या झटक्याने झाल्याचा दावा करत होती. परंतु, मुलीच्या शरीरावरील खुणा आणि आईच्या विधानांमुळे डॉक्टरांना संशय आला. त्यांनी तातडीने पोलिसांना या घटनेबाबत माहिती दिली. यानंतर या प्रकरणाचा तपास सुरू झाला.
कळंबोली पोलीस ठाण्याचे पोलीस अधिकाऱ्यांनी या मृत्यूबाबत संशय व्यक्त करत विशेष शवविच्छेदनाची मागणी केली. या शवविच्छेदन अहवालात मुलीचा मृत्यू नैसर्गिक नसून गळा दाबल्यामुळे गुदमरून झाल्याचे स्पष्ट झाले. या ठोस पुराव्यानंतर पोलिसांनी संबंधित महिलेची सुमारे सहा तास कसून चौकशी केली. सुरुवातीला नकार देणाऱ्या आईने अखेर पोलिसांसमोर आपला गुन्हा मान्य केला आणि हत्येची कबुली दिली.
या हत्येमागील धक्कादायक कारण ऐकून पोलिसही चक्रावून गेले. आरोपी महिलेने सांगितले की, आपली मुलगी मराठी नीट बोलू शकत नव्हती आणि ती बहुतेक वेळा हिंदी शब्दांचा वापर करायची, या गोष्टीचा तिला प्रचंड राग होता. मात्र, सखोल चौकशीत असे समोर आले की, महिलेला मुलगी नको असून मुलगा हवा होता. मात्र मुलगा झाला नाही या नैराश्यातून ती गेल्या अनेक वर्षांपासून मानसिक तणावाखाली होती. या चिमुरडीला लहानपणापासूनच बोलण्यात काही अडचणी होत्या, ज्यामुळे आईची चिडचिड वाढत गेली.
आरोपी महिला विज्ञान शाखेची पदवीधर आहे, तर तिचा नवरा एका नामांकित कंपनीत आयटी इंजिनियर म्हणून कार्यरत आहेत. 2017 मध्ये त्यांचे लग्न झाले होते आणि 2019 मध्ये या मुलीचा जन्म झाला होता. ही महिला गेल्या काही काळापासून मानसिक आजारावर उपचार घेत असल्याचेही तपासात समोर आले आहे. कौटुंबिक कलह आणि मानसिक अस्वास्थ्य यातून ही भीषण घटना घडली असावी, असा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केला असून या प्रकरणी अधिक तपास सुरू आहे.

























































