
मध्य प्रदेशातील सतना जिल्ह्यात भाजप नगरसेविकेच्या पतीला एका महिलेचा छळ केल्याबद्दल आणि धमक्या दिल्याच्या आरोपावरून अटक करण्यात आली आहे. पीडित महिलेच्या तक्रारीनंतर आणि सोशल मीडियावर प्रसारित झालेल्या व्हिडिओच्या आधारे ही कारवाई करण्यात आली. या व्हिडिओमध्ये आरोपी महिलााशी वाद घालताना आणि प्रभाव दाखवत असल्याचे दिसत असल्याचा आरोप आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 22 डिसेंबर रोजी महिलेने सतना जिल्ह्यातील पोलीस अधीक्षक (एसपी) कार्यालयात लिखित तक्रार सादर केली. तक्रारीत तिने सांगितले की, भाजप नगरसेविकेचा पती अशोक सिंह याने गेल्या सहा महिन्यांपासून तिचा मानसिक आणि शारीरिक छळ केला. तक्रारीत महिलेने आरोप केला की, आरोपीने चाकूचा धाक दाखवून आपल्यावर बलात्कार केला, त्या घटनेचा व्हिडिओ रेकॉर्ड केला आणि तो व्हायरल करण्याची धमकी दिली. याशिवाय अनैतिक संबंधांना भाग पाडणे आणि विरोध केल्यास जीवंत मारण्याच्या धमक्या देणे असे गंभीर आरोपही महिलेने केले आहेत.
त्यानंतर 26 डिसेंबर 2025 रोजी एक व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला. त्यात आरोपी दुकानात बसून महिलेबरोबर वाद घालताना आणि असभ्य भाषा वापरताना दिसत असल्याचा आरोप आहे. महिला त्याला सोशल मीडियावर व्हिडीओ शेअर करण्याची धमकी देताच, “टाका सोशल मीडियावर, काहीही होणार नाही, मला कोणी काही करू शकत नाही,” असे तो म्हणताना दिसत असल्याचे म्हटले जाते. वाद वाढत असताना महिलेनं एसपी कार्यालयात जाण्याची सूचना केली असता आरोपीने “जेथे जायचे तेथे जा, माझे काहीही होणार नाही,” असे उत्तर दिल्याचा उल्लेख आहे.
या वादात महिलेने त्याच्यावर बलात्काराचा आरोपही स्पष्ट शब्दांत केला, मात्र आरोपीने आरोप नाकारत तक्रार करा, माझे काहीही होणार नाही, असे उघडपणे आव्हान दिल्याचे व्हिडिओत दिसत असल्याचा आरोप आहे. व्हिडिओ व्यापक प्रमाणात व्हायरल झाल्यानंतर आणि प्रकरण गाजल्यानंतर रामपूर पोलिसांनी अशोक सिंह विरुद्ध भारतीय दंड संहितेच्या नवीन तरतुदी म्हणजेच भारतीय न्याय संहिता (BNS) अंतर्गत कलम 74, 75(2), 79, 296(1) आणि 351(3) यांसह विविध कलमांखाली गुन्हा नोंदवला. पोलिसांनी आरोपीला उशिरा रात्री ताब्यात घेतले असून पुढील तपास सुरू असल्याचे सांगितले. स्थानिक प्रशासनातील अधिकाऱ्यांनी कायदा सर्वांसाठी समान असल्याचे सांगितले आणि आरोपीचा संभाव्य प्रभाव लक्षात न घेता प्रकरणाचा निष्पक्ष तपास करण्यात येईल, असे आश्वासन दिले.


























































