जेसीबीने महिलेला चिरडले, वांद्रे येथील संतापजनक घटना

प्रातिनिधीक फोटो

मैदानात झोपलेल्या महिलेला जेसीबीने चिरडल्याची घटना वांद्रे पश्चिमच्या चिंबई मैदानात घडली. मृत महिलेची ओळख पटली नाही. याप्रकरणी वांद्रे पोलिसांनी जेसीबी चालक मोह्हमद सलीम नूर खान याच्या विरोधात गुन्हा नोंद केला आहे.

भरतलाल जयस्वाल हे वांद्रे पोलीस ठाण्यात शिपाई म्हणून काम करतात. शुक्रवारी रात्री ते बीट मार्शल म्हणून गस्त करत होते. रात्री त्यांना एक पह्न आला. वांद्रे पश्चिम येथील चिंबई मैदानात महिला जखमी झाल्याने पोलिसांची मदत हवी असल्याचे त्यांना सांगण्यात आले. त्यानंतर ते घटनास्थळी गेले. मैदानात आल्यावर तेथे नागरिकांनी गर्दी केली होती.

त्या रात्री एक जण मैदानाच्या बाहेर गप्पा मारत उभा होता तेव्हा त्यांना एक महिला जखमी झाल्याचे दिसले. मृत महिला ही मैदानाच्या गेटपासून 25 फूट अंतरावर झोपली होती. जेसीबी चालक हा रिव्हर्स घेत होता. त्याला महिला तेथे झोपल्याचे समजले नाही. जेसीबीचे चाक महिलेच्या कमरेवर आणि पायावर घातल्याने ती जखमी झाली. तिला जखमी अवस्थेत भाभा रुग्णालयात दाखल केले. तेथे डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले. मृत महिलेची ओळख पटलेली नाही. जयस्वाल याने दिलेल्या तक्रारीवरून वांद्रे पोलिसांनी जेसीबी चालकाविरोधात गुन्हा नोंद केला आहे.