
आंध्र प्रदेशमधील अनाकापल्ली जिल्ह्यात मोठी रेल्वे दुर्घटना घडली आहे. टाटानगरहून एर्नाकुलमला जाणाऱ्या टाटानगर-एर्नाकुलम एक्सप्रेसला (18189) भीषण आग लागली. या आगीमध्ये दोन एसी कोच जळून खाक झाले असून एका 70 वर्षीय प्रवाशाचा होरळून मृत्यू झाला, तर शेकडो प्रवाशांनी वेळीच रेल्वेबाहेर उडी घेत जीव वाचवला.
मिळालेल्या माहितीनुसार, टाटा नगरहून एर्नाकुलमच्या दिशेने जाणारी एक्सप्रेस विशाखापट्टणमार्गे प्रवास करत होती. मध्यरात्री दीडच्या सुमारास दुव्वाडा ओलांडल्यानंतर एक्सप्रेसला आग लागली. ही रेल्वे अनकापल्ली जिल्ह्यातील यलमंचिली रेल्वे स्थानकाजवळ आल्यावर लोको पायलटला डब्यातून आगीच्या ज्वाळा निघताना दिसल्या. त्याने प्रसंगावधान राखत रेल्वे तत्काळ स्थानकावर थांबवली.
पँट्री कारच्या शेजारी असलेल्या B1 आणि M2 या दोन एसी डब्यांमध्ये भीषण आग लागली होती. गाडी यलमंचिली रेल्वे स्थानकाजवळ पोहोचल्यापूर्वीच आगीने रौद्र रुप धारण केले होते, त्यामुळे दोन्ही डबे आणि डब्यांधील प्रवाशांचे सामान पूर्णपणे जळून खाक झाले. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या चार गाड्यांनी घटनास्थळी धाव घेत आगीवर नियंत्रण मिळवले.
आग लागल्याची माहिती मिळताच प्रवाशांमध्येही घबराट पसरली आणि प्रवाशांनी जीव वाचवण्यासाठी रेल्वेमधून बाहेर उडी घेतली. मात्र विजयवाडा येथील रहिवासी चंद्रशेखर सुंदर (वय – 70) हे B1 डब्यात अडकले होते. त्यांना वेळीच बाहेर पडता आले नाही, त्यामुळे त्यांचा होरपळून मृत्यू झाला. पोलीस अधीक्षक (SP) तुहिन सिन्हा यांनी ही माहिती दिली.
Ernakulam Express fire – आंध्र प्रदेशमध्ये एर्नाकुलम एक्सप्रेसला भीषण आग; दोन एसी कोच जळून खाक, एका प्रवाशाचा मृत्यू pic.twitter.com/8zbmT1iC0a
— Saamana Online (@SaamanaOnline) December 29, 2025
दरम्यान, B1 डब्याचे ब्रेक ओव्हरहीट झाल्यामुळे ठिणग्या उडून आग लागली असावी असा प्राथमिक अंदाज आहे. या घटनेमुळे विशाखापट्टणम-विजयवाडा मार्गावरील रेल्वे वाहतूक तात्पुरती विस्कळीत झाली होती, ज्यामुळे अनेक गाड्यांना उशीर झाला. तसेच आगीच्या भक्ष्यस्थानी पडलेल्या डब्यांमधील प्रवाशांना तीन आरटीसी बसने सामलकोटला पाठवण्यात आले. तसेच सामलकोट येथून टाटानगर-एर्नाकुलम एक्सप्रेसला दोन नवीन एसी कोच जोडण्यात आले आणि नंतर एक्सप्रेस एर्नाकुलमच्या दिशेने रवाना झाली. या प्रकरणाच्या सखोल चौकशीचे आदेश रेल्वे अधिकाऱ्यांनी दिले.





























































