मुंबई, दिल्ली, कर्नाटकची अपराजित हॅटट्रिक; गोवा, बिहारसह यूपी, एमपीचेही नॉनस्टॉप विजय

रोहित शर्मा आणि विराट कोहली नसले तरी आज मुंबई आणि दिल्ली यांनी आपली अपराजित हॅटट्रिक साजरी केली. तसेच कर्नाटकने तामीळनाडूच्या 289 धावांचा यशस्वी पाठलाग करताना थरारक आणि सलग तिसऱ्या विजयाची नोंद केली. त्याचप्रमाणे गोवा, बिहार, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश या संघांनीही आपल्या विजयाची मालिका कायम राखताना विजय हजारे करंडकात विजयी हॅटट्रिक साजरी केली.

पहिल्या दोन लढतींप्रमाणे तिसऱ्या लढतीतही वन डेचा जोरदार खेळ पाहायला मिळाला. मुंबईने तिसऱ्या सामन्यातही पहिल्या डावातच आपला विजय निश्चित करताना दुबळय़ा छत्तीसगडचा 144 धावांत डाव गुंडाळला आणि विजयी लक्ष्य 24 व्या षटकांत गाठले. कर्णधार शार्दुल ठाकूरने पहिल्या षटकांतच सलामीवीर अनुज तिवारी आणि मयांक वर्माची विकेट काढत सनसनाटी सुरुवात केली. मग पुढच्या दोन्ही षटकांत आघाडीच्या दोन फलंदाजांना परतीचा मार्ग दाखवत छत्तीसगडची 4 बाद 10 अशी भयाण अवस्था केली, मात्र यानंतर कर्णधार अमनदीप खरे (63) आणि अजय मंडल (46) यांनी पाचव्या विकेटसाठी 105 धावांची विकेट घेत छत्तीसगडला सावरले. पण शम्स मुलानीने ही जोडी पह्डली आणि त्यानंतर छत्तीसगडचा डाव संपायला फार वेळ लागला नाही. त्याने सहापैकी पाच विकेट घेत 142 धावांवरच छत्तीसगडच्या डावावर पूर्णविराम लावला. मुलानीने 31 धावांत 5 विकेट टिपले.

मग 143 धावांचा पाठलाग करायला मुंबईला फार कष्ट करावे लागले नाही. अंगकृष रघुवंशी (68) आणि पदार्पणवीर इशान मुलचंदानीने (19) सलामीसाठी 42 धावांची सलामी दिली. मग रघुवंशीने सिद्धेश लाडच्या (ना. 48) साथीने 42 धावांची शतकी भागी रचत 24 व्या षटकातच मुंबईच्या विजयाची
हॅटट्रिक साजरी केली.

दिल्लीचा निसटता विजय

सौराष्ट्रने विश्वराज जाडेजा (115) आणि रुचित अहिरच्या 67 चेंडूंतील 7 चौकार आणि 5 षटकारांच्या जोरावर ठोकलेल्या 95 धावांच्या नाबाद खेळीच्या जोरावर 7 बाद 320 अशी दमदार मजल मारली होती. या धावांचा पाठलाग करताना दिल्लीने 248 धावांत आपले सहा फलंदाज गमावले होते. त्यामुळे सौराष्ट्रने सामन्यात आघाडी घेतली होती. तेव्हा गोलंदाजीत चमक दाखवणाऱ्या नवदीप सैनीने  (ना. 34) हर्ष त्यागीच्या (49) जोडीने सातव्या विकेटसाठी 69 धावांची भागी रचत दिल्लीचा विजय सोप्पा केला. विजयापासून 4 धावा दूर असताना त्यागी बाद झाला. पण पुढे सैनीने छत्तीसगडला जास्त संघर्ष करू दिले नाही. 41 धावांत 3 विकेट आणि 34 चेंडूंची नाबाद खेळी करणारा सैनी दिल्लीच्या विजयाचा शिल्पकार ठरला. दिल्लीच्या डावात प्रियांश आर्य (78) आणि तेजस्वी दहिया (53) यांनीही मोलाची भूमिका निभावली.

विदर्भचा विजय, महाराष्ट्राचा पराभव

जम्मू-कश्मीरने विदर्भसमोर 9 बाद 311 अशी जोरदार धावसंख्या उभारली होती. त्यानंतर अमन मोखाडे (139) आणि रविकुमार समर्थ  (114) यांनी वैयक्तिक शतकासह तिसऱ्या विकेटसाठी 218 धावांची भागी रचत विदर्भला विजयपथावर नेले. विदर्भने हा सामना 9 चेंडू आणि 5 विकेट राखून जिंकला. मात्र महाराष्ट्रच्या संघाला हिमाचल प्रदेशकडून अवघ्या 7 धावांनी हार सहन करावी लागली. पुखराज मानच्या 110 धावांच्या खेळीमुळे हिमाचलने 271 धावा केल्या होत्या तर महाराष्ट्राचा डाव 50 षटकांत 264 धावांपर्यंतच मजल मारू शकला. अंकित बावणेने 97 धावांची खेळी करत महाराष्ट्राला विजयाची संधी निर्माण केली होती. मात्र मधल्या फळीतील फलंदाजांच्या निराशाजनक कामगिरीने महाराष्ट्राला दुसरा पराभव सहन करावा लागला.

तसेच मध्य प्रदेशने सलग तिसरा विजय मिळवताना केरळचा 47 धावांनी पराभव केला. त्यांचा संघ 214 धावांतच आटोपला होता, पण मध्य प्रदेशच्या गोलंदाजांनी केरळचा डाव 167 धावांतच संपवला. बिहारने विजयाची हॅटट्रिक साजरी करताना मेघालयाला 9 बाद 217 धावांवर रोखत विजयी लक्ष्य 33 व्या षटकातच गाठले. पियुष सिंग (100) आणि आकाश राज (75) यांनी धुवाधार फलंदाजी करत बिहारला आणखी एक विजय मिळवून दिला.

जुरेलच्या शतकाला रिंकूची साथ

ध्रुव जुरेलच्या नाबाद 160 धावांच्या अफलातून शतकी खेळीला कर्णधार रिंकू सिंहच्या अर्धशतकी साथीनंतर गोलंदाजांनी दाखवलेल्या प्रभावी कामगिरीच्या जोरावर उत्तर प्रदेशने बडोद्याचा 54 धावांनी पराभव केला.

उत्तर प्रदेशकडून अभिषेक गोस्वामी आणि आर्यन जुयाल या सलामी जोडीने दमदार सुरुवात करत पहिल्या विकेटसाठी 77 धावांची भागीदारी रचली. आर्यन जुयाल बाद झाल्यानंतर ध्रुव जुरेल मैदानात उतरला. अभिषेक गोस्वामीही 51 धावांवर बाद झाला. त्यानंतर जुरेलने कर्णधार रिंकू सिंहसोबत डाव सावरत चौथ्या विकेटसाठी 144 धावांची महत्त्वपूर्ण भागीदारी केली. रिंकू सिंहने 63 धावांची खेळी केली. अखेरच्या षटकांत जुरेलने आक्रमक फलंदाजी करत 101 चेंडूंत 15 चौकार आणि आठ षटकारांसह नाबाद 160 धावा ठोकल्या. त्यामुळे उत्तर प्रदेशने 7 बाद 369 अशी मजल मारली. या लक्ष्याचा पाठलाग करताना बडोद्याचा डाव 50 षटकांत 315 धावांत संपला. कर्णधार कृणाल पंडय़ाने 82 धावा केल्या. उत्तर प्रदेशकडून झिशान अन्सारीने तीन, तर समीर रिजवी आणि विप्रज निगम यांनी प्रत्येकी दोन विकेट घेत विजयावर शिक्कामोर्तब केले.

कर्नाटकचा विजयी पाठलाग कायम

झारखंडच्या 413 धावांच्या आव्हानाचा जबरदस्त पाठलाग करत आपले विजयी अभियान सुरू करणाऱ्या कर्नाटकने दुसऱ्या सामन्यात केरळच्या 285 धावांचे आव्हानही सहज पार पाडले होते तर आज तामीळनाडूच्या 289 धावांना 17 चेंडू आधीच गाठले. कर्नाटकच्या डावात कर्णधार मयंक अगरवाल (58), कृष्णन श्रीजीत (77) आणि श्रेयस गोपाल (55) यांनी धमाकेदार कामगिरी केली.

नागालँडचा दणदणीत विजय

डेगा निश्चल (182) आणि सेदेजहाली रुपेरो (124) यांच्या शतकी खेळीच्या जोरावर नागालॅण्डने विजय हजारे ट्रॉफी प्लेट गटातील सामन्यात मिझोरमचा 177 धावांनी पराभव केला. नागालॅण्डने 50 षटकांत 4 बाद 399 धावा केल्या. प्रत्युत्तरात मिझोरमचा डाव 42 षटकांत 222 धावांत आटोपला. साहिल रझाने 104 धावांची झुंजार खेळी केली, मात्र इमलिवती लेमतुर आणि अकावी येप्थो यांच्या प्रत्येकी तीन विकेटमुळे मिझोरमला पराभव स्वीकारावा लागला.

म्हणूनच रोहितविराट हजारे करंडकाबाहेर

विजय हजारे करंडकात रोहित शर्मा आणि विराट कोहली मैदानात उतरल्यामुळे देशांतर्गत क्रिकेटला दुर्मिळ असा झगमगाट मिळाला. स्टेडियम भरून वाहू लागले, चाहत्यांचा उत्साह शिगेला पोहोचला. मात्र, दोनच सामने खेळल्यानंतर हे दोन्ही दिग्गज अचानक संघातून बाहेर पडले आणि चर्चांना उधाण आले. या निर्णयामागे कोणतीही दुखापत किंवा निवड समितीचा हस्तक्षेप नसून, बीसीसीआयचा स्पष्ट नियम कारणीभूत ठरला. पेंद्रीय करारात असलेल्या खेळाडूंना आंतरराष्ट्रीय ब्रेकदरम्यान किमान दोन देशांतर्गत सामने खेळणे बंधनकारक करण्यात आले आहे. रोहित आणि विराट यांनी ही अट पूर्ण करताच, नियमांनुसार त्यांची जबाबदारी संपली. विराटने 15 वर्षांनंतर हजारे करंडकात पुनरागमन करत दमदार फलंदाजी केली, तर रोहितनेही आपल्या शैलीत शतकी खेळी साकारत लक्ष वेधून घेतले. मात्र, आगामी आंतरराष्ट्रीय मालिकांचा विचार करता वर्कलोड मॅनेजमेंट आणि फिटनेस यांना प्राधान्य देण्यात आले. म्हणजेच, हजारे करंडकातून बाहेर पडणे हा पलायनाचा नव्हे, तर नियमपालन आणि नियोजनाचा भाग आहे.