
कतारमधील दोहा येथे झालेल्या फिडे जागतिक जलदगती बुद्धिबळ अजिंक्यपद स्पर्धेतील महिला गटात कोनेरू हम्पीने, तर खुल्या गटात अर्जुन एरिगैसी या हिंदुस्थानी खेळाडूंनी कांस्यपदक पटकाविले. जागतिक दर्जाच्या स्पर्धकांविरुद्ध दोघांनीही केलेल्या दमदार कामगिरीमुळे हिंदुस्थानी बुद्धिबळासाठी हा महत्त्वाचा क्षण ठरला आहे.
गतविजेती म्हणून स्पर्धेत उतरलेल्या कोनेरू हम्पीने अंतिम फेरीनंतर 8.5 गुणांसह संयुक्त आघाडी घेतली होती, मात्र आंतरराष्ट्रीय बुद्धिबळ महासंघाच्या टायब्रेक नियमांनुसार तिला तिसऱ्या स्थानावर समाधान मानावे लागले. त्यामुळे तिचे तिसरे जागतिक जलदगती बुद्धिबळ स्पर्धेचे विजेतेपद थोडक्यात हुकले. हम्पीने ही स्पर्धा जिंकली असती तर 2019 आणि 2024 नंतर तीन वेळा वर्ल्ड रॅपिड जेतेपद पटकावणारी ती पहिली महिला ठरली असती. तसेच चीनच्या जु वेनजुननंतर सलग दोन वेळा ही स्पर्धा जिंकणारी दुसरी महिला होण्याची संधीही तिने गमावली. टायब्रेकनंतर अलेक्झांड्रा गोर्याचकिनाने पहिले जागतिक जलदगती बुद्धिबळ स्पर्धेचे विजेतेपद मिळवले. आता हंपी दोहामध्येच होणाऱ्या वर्ल्ड ब्लिट्झ स्पर्धेच्या नव्या आव्हानासाठी सज्ज आहे.
22 वर्षीय अर्जुन एरिगैसीने जागतिक क्रमवारीतील अव्वल खेळाडू मॅग्नस कार्लसन आणि रशियाच्या व्लादिस्लाव आर्तेमिएव्ह या दिग्गज खेळाडूंच्या उपस्थितीत कांस्यपदक पटकावले. जागतिक जलदगती बुद्धिबळ स्पर्धेत पदक जिंकणारा विश्वनाथन आनंदनंतर तो हिंदुस्थानचा दुसरा पुरुष खेळाडू ठरला आहे. खुल्या गटातील अर्जुनचे कांस्यपदक हिंदुस्थानी बुद्धिबळासाठी ऐतिहासिक मानले जात आहे.


























































