धाराशीव, साताऱ्याने अंतिम फेरीचे मैदान मारले; राणा प्रताप पुरस्कार साताऱ्याच्या आयुष यादवला तर हिरकणी पुरस्कार धाराशीवच्या राही पाटीलला 

श्री समर्थ व्यायाम मंदिर, दादर आयोजित 39वी किशोर व किशोरी राज्य अजिंक्यपद व निवड चाचणी खो-खो स्पर्धेत शेवटच्या श्वासापर्यंत रंगलेल्या अंतिम सामन्यात किशोर गटात साताऱ्याने इतिहास घडवत पहिलेच अजिंक्यपद पटकावले, तर किशोरी गटात धाराशीवने आपले वर्चस्व कायम राखत पाचव्या अजिंक्यपदावर आपले नाव कोरले.

वडाळ्याच्या भारतीय क्रीडा मंदिराच्या मैदानावर सुवर्णक्षणांची बरसात झाली. अपेक्षेप्रमाणे किशोर गटाचा अंतिम सामना प्रचंड चुरशीचा ठरला. साताऱ्याने पुण्यावर 25-23 (मध्यंतर 12-12) असा अवघ्या दोन गुणांनी विजय मिळवत पहिलेच राज्य अजिंक्यपद जिंकले. मध्यंतराला दोन्ही संघांनी 10-10 गुणांसह 2-2 ड्रीम गुण मिळवत सामना रंगतदार केला होता. दुसऱ्या डावात साताऱ्याने संयमी व आक्रमक खेळ करत विजयाची काsंडी पह्डली. साताऱ्याकडून आयुष यादव (1.50 मि. संरक्षण व 8 गुण), आयुष पांगारे (1.30, 1.30 मि. संरक्षण व 2 गुण), वरद पोळ (1.30 मि. संरक्षण व 4 गुण), स्वराज गाढवे (1.20 मि. संरक्षण व 2 गुण), स्वराज उत्तेकर (1.30 मि. संरक्षण) यांनी अजिंक्यपदावर शिक्कामोर्तब केले. पुण्याकडून कर्तव्य गंदेकर, सोहम देशमुख, वेदांत गायकवाड, सत्यम सकट (6 गुण) यांनी दिलेली झुंज अखेर अपुरी ठरली.

किशोरी गटाच्या अंतिम सामन्यात धाराशीवने सोलापूरचा  24-18 असा 5 मिनिटे राखून 6 गुणांनी धुव्वा उडवला आणि पाचवे अजिंक्यपद पटकावले. पहिल्या डावातच धाराशीवने आक्रमण-संरक्षणाचा अप्रतिम समतोल साधत सामन्याची दिशा ठरवली होती. धाराशीवकडून राही पाटील (3.20 मि. संरक्षण व 6 गुण), स्वरांजली थोरात (2.05 मि. संरक्षण व 4 गुण), मुग्धा सातपुते, समीक्षा भोसले यांनी संघाला सुवर्णमुकुट मिळवून दिला. सोलापूरकडून ऋतुजा सुरवस, कार्तिकी यलमार यांनी प्रयत्न केले; मात्र गतवर्षीचे विजेतेपद यंदा टिकवता आले नाही.

स्पर्धेतील उत्कृष्ट कामगिरीसाठी किशोर गटात राणा प्रताप पुरस्कार (अष्टपैलू खेळाडू) आयुष यादव (सातारा), उत्कृष्ट संरक्षक सोहम देशमुख (पुणे), उत्कृष्ट आक्रमक वरद पोळ (सातारा) यांना प्रदान करण्यात आला. किशोरी गटात हिरकणी पुरस्कार (अष्टपैलू खेळाडू) राही पाटील (धाराशीव), उत्कृष्ट संरक्षक कार्तिकी यलमार (सोलापूर), उत्कृष्ट आक्रमक मुग्धा सातपुते (धाराशीव) यांनी पटकावला. या स्पर्धेचा पारितोषिक वितरण समारंभ महाराष्ट्र ऑलिम्पिक असोसिएशनचे सरचिटणीस संजय शेटये, श्री समर्थ व्यायाम मंदिराचे अध्यक्ष अॅड. अरुण देशमुख, सुरेंद्र विश्वकर्मा, महाराष्ट्र खो-खोचे सरचिटणीस डॉ. चंद्रजित जाधव यांच्या उपस्थितीत पार पडला.