
बांगलादेशात हिंदू कुटुंबांवर हल्ला करण्याची घटना उघडकीस आली आहे. पिरोजपूर जिल्ह्यात दम्रिताला गावात 5 घरे पेटवून देण्यात आली. ही घटना शनिवारी 27 डिसेंबरला रात्री घडली होती. घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. त्यानंतर घटनेची माहिती मिळाली.
प्राप्त माहितीनुसार या घरांना बाहेरून बंद करण्यात आले होते. हल्लेखोरांनी एका खोलीत कपडे टाकले आणि घर पेटवून दिले. त्यामुळे आग अतिशय वेगाने पसरली. आत अडकलेले लोक टीन आणि बांबूने बनलेले दरवाजे तोडून कसेबसे बाहेर पडले आणि आपले प्राण वाचविले. काही लोक आग विझवण्याचा प्रयत्न करतानाचा व्हिडीओ व्हायरल झाला. त्यानंतर हा प्रकार उघडकीस आला. या प्रकरणी पोलिसांनी पाच संशयितांना अटक केली असून त्यांची चौकशी करण्यात येत आहे.
अल्पसंख्याकांवर हल्ल्याच्या 6 महिन्यांत 71 घटना
बांगलादेशात हिंदू अल्पसंख्याकांवर ईशनिंदेचा आरोप करून हल्ले करण्याच्या घटना वाढल्या आहेत. गेल्या सहा महिन्यांत अशा 71 घटनांची नोंद झाली आहे. ‘ह्युमन राईट्स काँग्रेस फॉर बांगलादेश मायनॉरिटीज’ या बांगलादेशातील संस्थेने ही माहिती दिली आहे. बांगलोशातील 30 जिल्ह्यांत अशा घटना घडल्या आहेत. ईशनिंदेचा आरोप करून हल्ले करण्याचा एक पॅटर्न बांगलादेशात तयार होत असल्याचे या संघटनेने म्हटले आहे.




























































