
खेळण्यासाठी गेलेल्या अल्पवयीन मुलीसोबत तिच्याच इमारतीत राहणाऱ्या विकृताने गैरकृत्य केल्याची संतापजनक घटना उघडकीस आली आहे. या विकृताने मुलीला जबरदस्ती घरात नेऊन तिच्यावर अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केल्याची तक्रार तिच्या पालकांनी नेरळ पोलीस ठाण्यात केली. याप्रकरणी पोलिसांनी विकृताला बेड्या ठोकल्या आहेत.
शेलू बांधिवली परिसरात राहणारी मुलगी संध्याकाळी ५ वाजण्याच्या सुमारास भावासोबत सायकल चालवण्यासाठी इमारतीखाली गेली होती. दरम्यान ती सायकलची घंटी आणण्यासाठी पुन्हा घरी जात असताना तिला विकृताने जिन्यात अडवले. तेथे त्याने तिच्यासोबत अश्लील चाळे केले. तिने त्याला विरोध करण्याचा प्रयत्न केला असता त्याने तिच्या हाताला धरून घरात नेले व तेथे तिच्यावर अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर मुलीने आरडाओरडा करत तेथून पळ काढला व घडला प्रकार आईवडिलांना सांगितला. अखेर संतप्त आईवडिलांनी दिलेल्या तक्रारीनुसार नेरळ पोलिसांनी विकृताला अटक केली.

























































