
गँगस्टर इंद्रजीत सिंह यादव याच्या अडचणीच वाढ होण्याची शक्यता आहे. ED ने इंद्रजीत यादव याच्याशी संबंधित असलेल्या दिल्ली, गुरुग्राम आणि रोहतक येथील 10 ठिकाणांवर मोठी छापेमारी केली आहे. मनी लाँड्रिंगच्या एका मोठ्या प्रकरणाचा तपास करत असताना ही कारवाई करण्यात आली आहे. या दरम्यान ईडीने 5 आलिशान कार, 17 लाख रुपयांची रोख रक्कम आणि महत्त्वाची कागदपत्रे जप्त केली आहेत. इंद्रजीत यादवने बेकायदेशीर वसुली, शस्त्रांचा धाक दाखवून केलेले करार आणि इतर गुन्हेगारी कृत्यांतून कोट्यवधींची मालमत्ता कमावल्याचा संशय यंत्रणेला आहे.
इंद्रजीत सिंह यादव हा ‘जेम्स रेकॉर्ड्स एंटरटेनमेंट प्रायव्हेट लिमिटेड’ या कंपनीचा मालक आहे. त्याच्यावर हत्या, खंडणी, फसवणूक आणि जमीन बळकावणे असे अनेक गंभीर गुन्हे दाखल आहेत. हरियाणा आणि उत्तर प्रदेश पोलिसांनी नोंदवलेल्या 15 हून अधिक FIR आधारे ईडीने हा तपास सुरू केला आहे. यादव सध्या UAE मध्ये बसून हिंदुस्थानातील आपले गुन्हेगारी नेटवर्क चालवत असल्याचे तपासात समोर आले आहे.
पोलिसांच्या तपासादरम्यान अनेक गोष्टींची माहिती उघड झाली आहे. अपोलो ग्रीन एनर्जी लिमिटेड सारख्या काही प्रसिद्ध मोठ्या कंपन्यांनी झज्जरमधील खासगी सावकारांकडून मोठ्या प्रमाणात रोख रक्कम कर्ज म्हणून घेतली होती. या कर्जाच्या परतफेडीवरून जेव्हा वाद निर्माण झाले, तेव्हा यादवने ‘strongman’ म्हणून मध्यस्थी केली. त्याने आपल्या गुंडांच्या मदतीने आणि स्थानिक टोळ्यांचा वापर करून कंपन्यांवर दबाव आणला आणि हे आर्थिक वाद जबरदस्तीने सोडवले. या बेकायदेशीरपणे सोडवलेल्या वादांमधून त्याला शेकडो कोटींचे कमिशन मिळाल्याचा आरोप आहे.
सध्या ईडीतर्फे या प्रकरणाची सखोल चौकशी केली जात आहे. तसेच ईडी या प्रकरणातील इतर भागीदार कंपन्या आणि यादवच्या सहकाऱ्यांच्या भूमिकेची सखोल चौकशी करत असून, त्याचे परदेशातील आर्थिक व्यवहारही तपासले जात आहेत.




























































