
घनदाट धुके आणि प्रदूषित हवेमुळे नॅशनल कॅपिटल रीजन (NCR) मधील नागरिकांना गंभीर अडचणींना सामोरे जावे लागले. भारतीय हवामान विभागाने (IMD) दिल्लीसाठी ‘यलो अलर्ट’ जारी करताना सांगितले की, धुक्याची स्थिती मागील दिवसापेक्षा अधिक दाट होती आणि अनेक भागांत दृश्यमानता कमी झाली.
रिअल-टाईम अपडेट्स तपासण्याचा सल्ला
उत्तर हिंदुस्थानातील काही विमानतळांवर दाट धुक्यामुळे कमी दृश्यमानतेच्या परिस्थितीत उड्डाण ऑपरेशन्सवर परिणाम झाला असून उड्डाणांना विलंब होण्याची शक्यता आहे. प्रवाशांनी गैरसोयीपासून बचाव करण्यासाठी आपल्या-आपल्या एअरलाईनकडून थेट फ्लाइटचे रिअल-टाईम अपडेट्स तपासावेत आणि नेहमीपेक्षा लवकर विमानतळावर पोहोचावे, असा सल्ला देण्यात आला आहे.
सूत्रांच्या माहितीनुसार, ऑपरेशनल अडचणींमुळे 31 डिसेंबर रोजी इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावर (IGI) एकूण 148 उड्डाणे रद्द करण्यात आली. यामध्ये 70 जाणारी आणि 78 येणारी उड्डाणे समाविष्ट होती. याशिवाय दोन उड्डाणांचे डायव्हर्जन करण्यात आले.
इंडिगो एअरलाईन्सनेही बुधवारी ट्रॅव्हल अॅडव्हायजरी जारी करून दिल्ली आणि उत्तर हिंदुस्थानातील अनेक विमानतळांवर दाट धुक्यामुळे उड्डाणांमध्ये अडथळ्यांची शक्यता असल्याची सूचना दिली. धुक्याची स्थिती कायम राहिल्यास दिवस पुढे सरकत असताना डिपार्चर आणि अरायव्हल वेळापत्रकावर परिणाम होऊ शकतो, असेही इंडिगोने म्हटले आहे. परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवले असून अडथळे कमी करण्यासाठी आवश्यक तेथे ऑपरेशनल बदल केले जात असल्याचेही कंपनीने स्पष्ट केले.
दिल्ली विमानतळावरील दृश्यमानता (सकाळी 8.30 वाजता)
सामान्य दृश्यमानता – 250 मीटर
रनवेवरील दृश्यमानता – 600 ते 1000 मीटर दरम्यान




























































