
महापालिका निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी, मंगळवार निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालय-1 मध्ये खुनाच्या गुन्ह्यातील आरोपी मुजीब सय्यद मोईनोद्दीन उर्फ मुजीब डॉन याने उमेदवारी अर्ज दाखल केला. हर्सूल कारागृहात अटकेत असलेल्या मुजीबला पोलिस बंदोबस्तात निवडणूक कार्यालयात आणण्यात आले होते, अशी माहिती निवडणूक निर्णय अधिकारी लतीफ पठाण यांनी दिली.
महापालिका निवडणुकीसाठी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी सर्व 9 निवडणूक कार्यालयांत मोठी गर्दी झाली होती. निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालय-1 अंतर्गत येणाऱ्या प्रभाग क्रमांक 3, 4 आणि 5 साठी उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी उमेदवार आणि कार्यकर्त्यांची मोठी उपस्थिती पाहायला मिळाली. वाढत्या गर्दीमुळे उमेदवारांना टोकन देण्यात आले होते आणि प्राप्त अर्जांची तपासणी करून स्वीकारण्यात आले.
दरम्यान, दुपारी सुमारे 2 वाजता हर्सूल कारागृहात अटकेत असलेला पडेगाव येथील मुजीब सय्यद मोईनोद्दीन याला उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी स्मार्ट सिटी कार्यालयालगत घनकचरा विभागाच्या निवडणूक कार्यालयात आणण्यात आले. यावेळी कारागृह पोलिसांसोबत शहर पोलिसांचाही कडक बंदोबस्त तैनात होता.
मुजीबवर ऑक्टोबर महिन्यात जुन्या वादातून एका रिक्षाचालकाचा खून केल्याचा आरोप असून तो सध्या या प्रकरणात न्यायालयीन कोठडीत आहे.



























































