राजस्थानमध्ये नववर्षाच्या पूर्वसंध्येला पोलिसांना मोठे यश, खतांच्या गोण्यात लपवलेली 350 किलो स्फोटकं जप्त

राजस्थानातील टोंक येथे सुरक्षा यंत्रणांना मोठे यश मिळाले आहे. जिल्हा विशेष पथकाने (डीएसटी) टोंक–जयपूर राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 52 वर नाकाबंदीदरम्यान एका कारमधून मोठ्या प्रमाणात स्फोटक साहित्य जप्त केले. मारुती सियाझ कारमधून सुमारे 150 किलो अमोनियम नायट्रेट, 200 डेंजर एक्सप्लोझिव्ह कार्ट्रिज आणि 6 गठ्ठे सेफ्टी फ्यूज वायर (सुमारे 1100 मीटर) जप्त करण्यात आले असून या प्रकरणी दोन जणांना अटक करून त्यांची चौकशी सुरू आहे.

ही कारवाई डीएसटी प्रभारी ओमप्रकाश चौधरी यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आली. पोलिसांना मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार एनएच-52 वर स्फोटक साहित्य वाहतूक होत असल्याची सूचना मिळाल्यानंतर बरौनी पोलिस ठाणे हद्दीत नाकाबंदी उभारण्यात आली. त्यावेळी संशयित मारुती सियाज कार थांबवून तपासणी करण्यात आली असता, कारमध्ये ठेवलेल्या युरिया खताच्या पोत्यांमध्ये लपवून ठेवलेले अमोनियम नायट्रेट सापडले.

अटक करण्यात आलेल्या दोन्ही आरोपींची ओळख सुरेंद्र पटवा आणि सुरेंद्र मोची अशी झाली असून ते बूंदी जिल्ह्यातील करवर परिसरातील रहिवासी आहेत. स्फोटक सामग्री अतिशय कुशलतेने खताच्या पोत्यांत लपवून नेली जात होती, जेणेकरून कोणाला संशय येऊ नये. पोलिसांचा अंदाज आहे की हे स्फोटक एखाद्या मोठ्या कटाचा भाग म्हणून एका ठिकाणावरून दुसरीकडे नेले जात होते.

टोंकचे डीएसपी मृत्युंजय मिश्रा यांनी सांगितले की जप्त करण्यात आलेले अमोनियम नायट्रेट धोकादायक श्रेणीत मोडते आणि त्याचा वापर स्फोटक कृत्यांमध्ये होऊ शकतो. अलिकडच्या काळात दिल्लीसह देशातील काही भागांत घडलेल्या स्फोटांमध्ये अमोनियम नायट्रेटचा वापर झाल्याचे समोर आले आहे. त्यामुळे ही जप्ती सुरक्षा यंत्रणांनी अत्यंत गंभीरतेने घेतली आहे.

सध्या आरोपींना स्फोटक सामग्री कोठून आणली, कुठे पोहोचवायची होती आणि या प्रकरणामागे आणखी कोणाचा सहभाग आहे का, याबाबत चौकशी करण्यात येत आहे. या टोळीचा मोठ्या नेटवर्कशी किंवा गुन्हेगारी कटाशी संबंध आहे का, याचाही तपास सुरू आहे. जप्त स्फोटक सामग्री ताब्यात घेऊन पुढील तपास सुरू आहे. या कारवाईनंतर टोंकसह परिसरातील जिल्ह्यांमध्ये सुरक्षा यंत्रणा सतर्क मोडवर ठेवण्यात आल्या आहेत.