
>> वैश्विक
आज 1 जानेवारी. एकविसाव्या शतकातलं पाव शतक पंचवीस वर्षे संपली. एका सहस्रकाचीही पहिली पंचवीशि झाली. आता तिसरं सहस्रक संपेपर्यंत प्रत्येक शतकात असा ‘पहिल्या’ पंचवीशिचा काळ येतच राहणार. आपली ही कालमापनाची पद्धत, त्यामागचं औत्सुक्य किंवा गतकाळाचा लेखाजोखा वगैरे गोष्टींची कल्पना. हा ‘कालपट’ घडवणाऱया सूर्य आणि पृथ्वी यांना असण्याचं कारण नाही. अब्जावधी वर्षे पृथ्वी 365 दिवसांतच सूर्याभोवती फिरतेय. पृथ्वीच्या निर्मितीच्या काळात हा वेग कदाचित वेगळा असेल तर तो विषयही पर्टर्बेशन किंवा समतोलातील बदलाचाच.
आपला आजचा विषय आहे तो पाश्चात्य कालगणनेनुसार सुरू होणाऱया सौर नववर्षाचा. त्यांचं ‘कॅलेंडर’ किंवा कालमापन केवळ सूर्य-पृथ्वी नात्यावर अवलंबून आहे, तर आपली कालगणना चांद्रमासावर आधारित आहे. आपल्या कालमापनात पौर्णिमान्त किंवा आमान्त महिने असतात. आपला मराठी महिना अमावस्येला संपतो. देशातल्या काही कालगणनेत महिन्याची समाप्ती पौर्णिमेला होते. म्हणून आपले सर्व सण एतद्देशीय ऋतुचक्र आणि चांद्रतिथी (दिनांक) यावर आधारित असत. आपला एकमेव सौर-सण संक्रात तो 14 जानेवारीलाच येतो. त्यासंबंधीची माहिती चैत्र पाडव्याच्या वेळी घेता येईल.
या लेखाचं शीर्षक आहे ते ‘ग्रेगरियन’ कालगणनेचं. ही कालगणना असलेली दिनदर्शिका पाश्चात्यांनी (इंग्रजांनी) आपल्याकडे रूढ केली. त्यांच्या सत्तेच्या काळात त्यांचे व्यवहार ज्या कालमापनानुसार व्हायचे तीच पद्धत त्यांनी इथे वापरली. तोपर्यंत आपल्या देशात चांद्रमासावर आधारित विविध कालगणना होत्या आणि सांस्कृतिक बाबतीत त्यांचाच वापर होतो. व्यावहारिक गोष्टीत मात्र आज जवळपास सर्व जगात प्रचलित झालेलं पाश्चात्य कॅलेंडरच आपण सोयीसाठी वापरतो. त्यानुसार एका नव्या वर्षाचा आजचा पहिला दिवस.
हे सारं खगोलशास्त्र्ााशी म्हणजेच ‘आभाळमाये’शी निगडित असल्याने इथे त्याचा संक्षिप्त ऊहापोह. जे पाश्चात्य कॅलेंडर सध्या जगभर वापरलं जातं त्याचं स्वरूप पूर्वी तसं नव्हतं. अगदी सुरुवातीला म्हणजे इसवी सन पूर्व 738 मध्ये रोम्युलस राजाच्या काळातील कॅलेंडर अस्तित्वात आले. ते दहा महिन्यांचे आणि 304 दिवसांचेच होते. त्यात हिवाळ्याचा 60 दिवसांचा काळ ‘डेड पीरियड’ किंवा ‘मृत काळ’ म्हणून जमेस धरला जात नसे.
त्या वेळच्या इंग्लिश महिन्यांची दहा नावे मार्टिअस (मार्च), एप्रिलीअस (एप्रिल), मायस (मे), ज्युनिअस (जून) अशी होती. ही सर्व देवतांची नावे. मार्चमध्येच वर्षाचा आरंभ व्हायचा. जूननंतरचे सहा महिने त्यांच्या अंकांवरून म्हणजे क्वान्टिलिस (पाचवा), सेक्स्टिलीस (सहावा), सप्टेंबर (सातवा), ऑक्टोबर (आठवा), नोव्हेंबर (नववा) आणि डिसेंबर (दहावा) अशा प्रकारे असल्याने पृथ्वीच्या सौर परिक्रमेचा विचार त्यात होता तो ‘डेड पीरियड’चे साठ दिवस जमा करून. सतत 60 दिवस विनादिनांकाचे म्हणजे अजब. त्या वेळी फक्त ‘तारां’चा वापर होत असावा.
इसवी सन पूर्व काळातच त्यात न्यूमा पॉम्पिलिअस राजाने बदल करून जानेवारी आणि फेब्रुवारी हे दोन महिने बहुधा हिवाळ्याच्या मृत काळाऐवजी प्रचलित केले. त्यामुळे ते वर्षाच्या शेवटचे होते. त्यानंतर इसवी सनापूर्वी सत्तेवर आलेल्या ज्युलिअस सीझरने क्वान्टिलीस किंवा पाचव्या महिन्याला आपलं नाव दिलं त्यामुळे त्याचा ‘जुलै’ झाला. त्यानंतर ऑगस्टस सीझरचं नाव सेक्स्टिलिस किंवा सहाव्या महिन्याला मिळाल्याने त्याचा ‘ऑगस्ट’ झाला. आता मार्चला सुरू होऊन फेब्रुवारीला संपणारं वर्ष 12 महिन्यांचं झालं. पुढे शेवटचे जानेवारी, फेब्रुवारी सुरुवातीला आणले गेले आणि सप्टेंबरपासूनच्या अंकांशी (सात, आठ वगैरे) निगडित असलेल्या महिन्यांना नामार्थ उरला नाही. पूर्वी नावानुसार सातवा असलेला सप्टेंबर आपण आता नववा महिना मानतो.
बरं, हे ज्युलियन कॅलेंडरसुद्धा दिवसाचं यथायोग्य कालदर्शक नव्हतं. त्यामुळे पृथ्वीच्या सूर्याभोवती होणाऱया भ्रमणाचं गणित तंतोतंत न बसता त्यात फरक पडून वसंत संपात बिंदू किंवा व्हर्नल इक्विनॉक्स 21 मार्चला न येता पुढे सरकायला लागला. त्यामुळे 5 एप्रिलच्या ‘इस्टर’चं गणित चुकायला लागलं. त्यासाठी कालगणना निश्चितच असणं गरजेचं होतं. इ. स. 325 पासूनचं ज्युलियन कालगणना सदोष झाली होती.
म्हणून त्यामध्ये पोप ग्रेगरी यांनी 1582 मध्ये बदल केला. ग्रेगरी यांनी एका वर्षाचा काळ 365 पूर्णांक 2425 इतका सूक्ष्म पद्धतीने ठरवला तो आजच्या आधुनिक कालमापनाच्या जवळचा आहे. आता आपलं वर्ष 365.2422 इतकं आहे. यातून झालेला 10 दिवसांचा बदल दूर करण्यासाठी ग्रेगरी यांनी इ. सन 1582 च्या ऑक्टोबरच्या 4 तारखेनंतरची तारीख एकदम 15 ऑक्टोबर करून 10 दिवसांचा घोळ संपवला. वर्षसुद्धा दर 4 वर्षांनी आणि दर 400 वर्षांनी 1 दिवस अधिक किंवा 366 दिवसांचे केले. ज्या आकडय़ाला 400 ने भाग जातो तेच चौशतकान्त वर्ष ‘लीप इयर’ असेल असे ठरले. त्यामुळे इ. सन 1600 आणि 2000 ही लीप वर्षे होती.
शाळेत असताना गणिताचे मास्तर आम्हाला एक कोडं घालणारा प्रश्न विचारत. ‘एजूसनो-30’ म्हणजे काय? तर केवळ एप्रिल, जून, सप्टेंबर आणि नोव्हेंबर हे ‘तिशी’ (30 दिवसांचे) महिने, फेब्रुवारी 28 किंवा 29 दिवसांचा व बाकीचे सात महिने 31 दिवसांचे करण्यात आले. त्यानुसार आजपासून सुरू होत असलेला जानेवारी (उच्चार जॅन्युअरी) महिना 31 दिवसांचा तो ग्रेगरियन कॅलेंडरनुसार. मात्र रूढीवादी पाश्चात्यांनी लगेच ही कालगणना मान्य केली नाही. इंग्लंडमध्ये ती पहिल्या एलिझाबेथच्या काळात अमलात आली, तर ग्रीस देशाने ती तब्बल विसाव्या शतकात 1923 मध्ये (बहुधा नाइलाजाने) स्वीकारली आणि नंतर जगानेसुद्धा!






























































