ईव्हीएमवरील ईएनडी बटणाचा गोंधळ संपणार, राज्य निवडणूक आयोगाचा महत्त्वपूर्ण निर्णय

मुंबई वगळता राज्यभरातील महापालिकांमध्ये बहुसदस्यीय प्रभाग पद्धतीने होणाऱ्या निवडणुकीत मतदारांकडून एखाद्या उमेदवाराला मतदान करण्यास होणारा विरोध आणि त्यामुळे मतदान प्रक्रियेत होणारा गोंधळ व विलंब टाळण्यासाठी ईव्हीएमवरील ईएनडी बटण बंद ठेवण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय राज्य निवडणूक आयोगाने घेतला आहे.

एखाद्या मतदाराने पसंतीच्या उमेदवाराला किंवा नोटाला मत देण्यास नकार दिल्यास मतदानाची प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी केंद्राधिकाऱ्याने उपस्थित मतदान प्रतिनिधींसोबत नोटाचे बटण दाबून ही प्रक्रिया पूर्ण करावी, असे आदेश आयोगाने दिले आहेत. निवडणूक आयोगाने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी विकसित केलेल्या ईव्हीएमच्या बॅलेट युनिटवर शेवटचे (16 वे) बटण ईएनडीचे ठेवले आहे. राज्य निवडणूक आयोगाने डिसेंबर 2022 च्या आदेशान्वये ईव्हीएमवरील ईएनडी बटण कसे वापरायचे याचे आदेश दिले होते. या निर्णयानुसार, मतदारांकडून त्यांच्या प्रभागात 5 उमेदवारांना मत देणे अभिप्रेत असतानाही ते केवळ 2 उमेदवारांना मत देतात. त्यानंतर नोटा बटण दाबून निवडणूक प्रक्रिया संपल्याचे निर्देशित करावे लागते. पण मतदार हे बटण दाबत नाहीत. यामुळे त्याची मतदान प्रक्रिया पूर्ण होत नाही. परिणामी मतदान केंद्राधिकाऱ्यांनाच ईएनडी बटणाचा वापर करून ही प्रक्रिया पूर्ण करावी लागत होती. स्थानिक पातळीवर या बटणाविषयी येणाऱ्या विविध अडचणी तथा मतदानास होणारा विलंब पाहता क्षेत्रीय अधिकाऱ्यांनी केलेल्या तक्रारींची दखल घेत आयोगाने या निवडणुकीत ईएनडी बटण पांढऱ्या मास्किंग टॅबने बंद करण्याचे आदेश दिले आहेत.

आयोगाने काय म्हटले आहे…

एखादा मतदार आपले मतदान पूर्ण न करता मतदान कक्षातून बाहेर पडला तर मतदान अधिकारी किंवा मतदान केंद्राध्यक्षांना कंट्रोल युनिटवरील लाल दिवा न विझल्यामुळे व बिप साऊंड न वाजल्यामुळे मतदाराने मतदान पूर्ण केले नाही ही गोष्ट लक्षात येईल. त्या स्थितीत मतदान केंद्रप्रमुखांनी संबंधित मतदाराला त्याचे मतदान पूर्ण न झाल्याची कल्पना देऊन पसंतीच्या उमेदवाराला मत देऊन अथवा नोटा बटण दाबून मतदान प्रक्रिया पूर्ण करण्याची विनंती करावी.