
नवं वर्ष क्रीडाविश्वासाठी केवळ कॅलेंडर बदलणारं नाही, तर थरार, जल्लोष आणि वर्ल्ड कपच्या धमाक्यांनी भरलेलं ठरणार आहे. क्रिकेटपासून फुटबॉलपर्यंत, पॅरा ऑलिम्पिकपासून राष्ट्रकुल स्पर्धांपर्यंत आणि हॉकी, बास्केटबॉल ते आशियाई क्रीडा स्पर्धांपर्यंत 2026 हे वर्ष म्हणजे क्रीडाविश्वासाठी महापर्व असेल. खेळाडूंसाठी कसोटीची तर क्रीडाप्रेमींसाठी पर्वणीची ही वर्षगाथा ठरणार आहे. स्टेडियममध्ये जाऊन किंवा टीव्ही-डिजिटल पडद्यावर ‘याचि देही याचि डोळा’ खेळाचा महासोहळा अनुभवण्याची संधी देणारे 2026 वर्ष असेल.
क्रिकेटपासून सुरुवात, फुटबॉलपर्यंत शिखर
नववर्षाची पहिलीच चाहूल 19 वर्षांखालील युवकांच्या क्रिकेट वर्ल्ड कपने लागणार आहे. झिम्बाब्वे-नामिबियात होणाऱया या स्पर्धेनंतर क्रिकेटचा खरा रंग चढेल तो पुरुषांच्या आयसीसी टी-20 वर्ल्ड कपमध्ये, जो हिंदुस्थान आणि श्रीलंकेत रंगणार आहे. तसेच जुन-जुलैदरम्यान महिला टी-20 वर्ल्ड कप इंग्लंड-वेल्समध्ये होणार असल्याने क्रिकेटप्रेमींसाठी क्रिकेटची नॉनस्टॉप मेजवानी असेल, हे निश्चित आहे.
फिफा वर्ल्ड कप सर्वोच्च
या वर्षाचा कळसाध्याय असेल अमेरिका, कॅनडा आणि मेक्सिकोमध्ये संयुक्तपणे होणारा फिफा वर्ल्ड कप. अवघं जग याची आतुरतेने वाट पाहात असली तरी अमेरिकेतील फुटबॉलप्रेमींनी या स्पर्धेला अभूतपूर्व प्रतिसाद दिल्यामुळे आजवरचा सर्वात श्रीमंत, गर्दीचा आणि कमाईचा वर्ल्ड कप ठरणार, याचे संकेत आतापासून मिळू लागले आहेत. 48 संघ, 104 सामने आणि महिनाभर चालणारा फुटबॉलचा महासागर हा फिफा वर्ल्ड कप नव्या इतिहासाची नोंद करणार आहे.
पॅरालिम्पिक, राष्ट्रकुल आणि जागतिक स्पर्धांचा जल्लोष
इटलीत होणारे हिवाळी ऑलिम्पिक आणि पॅरालिम्पिक गेम्स क्रीडाविश्वात नवी ऊर्जा भरणार आहेत. त्यानंतर ग्लासगो (स्कॉटलंड) येथे रंगणाऱया राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा पुन्हा एकदा राष्ट्रकुलातील देशांना एकत्र आणण्यासाठी सज्ज होईल.
हॉकीप्रेमींसाठी तर हा वर्षावच
पुरुष आणि महिला हॉकी वर्ल्ड कप बेल्जियम-नेदरलॅण्ड्समध्ये एकाच वेळी होणार आहेत. बास्केटबॉलमध्ये महिला वर्ल्ड कप (जर्मनी), फुटबॉलमध्ये 20 वर्षांखालील महिला वर्ल्ड कप (पोलंड) आणि आशियाई क्रीडा स्पर्धांचा भव्य मंच जपानच्या ऐची-नागोया येथे रंगेल. यामुळे आशियाई क्रीडाविश्वही भारावून जाणार आहे. एवढेच नव्हे तर या सोबतीला दरवर्षी होणारे टेनिसच्या ग्रॅण्डस्लॅम आणि जागतिक स्पर्धा, फॉर्म्युला वनच्या ग्रांप्रि स्पर्धा, ऍथलेटिक्सच्या जागतिक स्पर्धा आहेतच. एकूण काय तर 2026 हे वर्ष म्हणजे वर्ल्ड कपचा वर्षाव. क्रीडापटूंना आपली झेप दाखवण्याची संधी, तर क्रीडाप्रेमींना खेळाच्या महासागरात मनसोक्त डुंबण्याचा योग. नवं वर्ष क्रीडाविश्वासाठी फक्त येत नाहीये तर ते धडधडत, गर्जत आणि जल्लोषात येत आहे.
2026 मधील प्रमुख वर्ल्ड कप व क्रीडा स्पर्धांचा कार्यक्रम
- 15 जाने. – 1 फेब्रु. ः 19 वर्षांखालील युवा क्रिकेट वर्ल्ड कप (झिम्बाब्वे-नामिबिया)
- 23 जाने. – 6 फेब्रु. ः दक्षिण आशियाई स्पर्धा (पाकिस्तान)
- 6 – 22 फेब्रु. ः हिवाळी ऑलिम्पिक गेम्स (इटली)
- 7 फेब्रु. – 8 मार्च ः आयसीसी पुरुष टी-20 वर्ल्ड कप (हिंदुस्थान-श्रीलंका)
- 6 – 15 मार्च ः हिवाळी पॅरालिम्पिक गेम्स (इटली)
- 11 जून – 19 जुलै ः फिफा वर्ल्ड कप (अमेरिका-कॅनडा-मेक्सिको)
- 12 जून – 5 जुलै ः महिला टी-20 वर्ल्ड कप (इंग्लंड-वेल्स)
- 23 जुलै – 2 ऑगस्ट ः राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा (ग्लासगो, स्कॉटलंड)
- 14 – 30 ऑगस्ट ः पुरुष हॉकी वर्ल्ड कप (बेल्जियम-नेदरलॅण्ड्स)
- 14 – 30 ऑगस्ट ः महिला हॉकी वर्ल्ड कप (बेल्जियम-नेदरलॅण्ड्स)
- 4 – 13 सप्टेंबर ः महिला बास्केटबॉल वर्ल्ड कप (जर्मनी)
- 5 – 27 सप्टेंबर ः 20 वर्षांखालील महिला फुटबॉल वर्ल्ड कप (पोलंड)
- 19 सप्टें. – 4 ऑक्टो. ः आशियाई क्रीडा स्पर्धा (ऐची-नागोया)
- 18 – 24 ऑक्टोबर ः आशियाई पॅरा गेम्स (ऐची-नागोया).

































































