
निवडणूक म्हटलं की उमेदवारांकडून जेवणावळी आल्याच. उमेदवाराला निवडणूक खर्चाची एकूण मर्यादा नऊ लाख रुपये आहे. 289 प्रकारचे खर्च दाखवायचे झाल्यास ताळेबंद पाहणाऱ्याला ‘नाकीनऊ’ येतात. एक उमेदवार निवडणुकीत किती लोकांना जेवण देतो आणि किती थाळ्या दाखवतो हा निवडणूक आयोगासाठी संशोधनाचा विषय आहे. मांसाहारी थाळीसाठी निवडणूक आयोगाने जाहीर केलेली दरसूची स्वस्तात मस्त आहे.
सध्या सांगली, मिरज, कुपवाड शहर महानगरपालिका निवडणुकीची धामधूम सुरू झाली आहे. निवडणूक आयोगाने जेवण आणि चहा, नाष्टय़ासाठीची दरसूची परवडेल अशीच आहे. टपरीवरील चहा, कॉफी आणि ढाब्यावरील थाळीचे दर आयोगाने गृहीत धरले आहेत. शाकाहारी थाळीसाठी 70, स्पेशल थाळी 120, मांसाहारी थाळीमध्ये अंडाकरी 120, चिकन 150, मटण 200, मच्छी 200 ही दरसूची आहे. साधा चहा सात, तर स्पेशल चहा 15 रुपये आहे. कॉफीचा दर तितकाच आहे. शिरा, पोहे, उपीट 15 रुपये, मिसळ 40 रुपये, पाणी बॉटल 20 रुपये, 200 मिली शीतपेये 20 रुपये आहे.
< उमेदवाराच्या खर्चात मंडप 8 रुपये तर लाकडी स्टेज 20 रुपये प्रति चौरसफूट, शोभा कमान 2500, लोखंडी, लाकडी, प्लॅस्टिक खुर्ची सहा ते दहा रुपये, सोफासेट 500 रुपये, व्हीआयपी खुर्ची 125 रुपये, टेबल 250 रुपये, गादी 60 रुपये, लोड 40 रुपये, पाणी टँकर प्रतिदहा हजार लिटर, एक हजार रुपये, पाणी जार वीस रुपये, काचेचे ग्लास सहा रुपये, स्टील आणि प्लॅस्टिक 4 रुपये, फॅनसाठी 200 ते 350 रुपये असे एकूण 289 प्रकारच्या खर्चाचे दर निवडणूक यंत्रणेने निश्चित केले आहेत.






























































