
राज्यातील महापालिका निवडणुकीत उमेदवारी वाटपावरून भाजपमध्ये अराजकता निर्माण झाली आहे. कित्येक वर्षांपासून पक्षासाठी सतरंज्या उचलणाया निष्ठावान कार्यकर्त्यांना डावलून आयारामांना रेड कार्पेट टाकले आहे. यामुळे कार्यकर्त्यांमध्ये तीव्र संताप आहे. काँग्रेसमुक्त भारतचा नारा देणारा भाजप आता कार्यकर्ता मुक्त भाजप झाला आहे, अशी जहरी टीका काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी भाजपवर केली आहे.
नगरसेवकपदासाठी भाजपमध्ये जो गोंधळ सुरू आहे, तो आगामी विधानसभा निवडणुकीतही कायम असेल. मूळ भाजप आणि संघाच्या कार्यकर्त्यांना बाजूला सारून हा पक्ष आता ’उप्रयांच्या’ हाती गेला आहे. मूळ भाजपा व संघाच्या कार्यकर्त्यांना बाजूला सारून उप्रयांच्या हाती भारतीय जनता पक्ष गेल्याने लवकरच या पक्षाचे नियंत्रण हे नागपूरच्या रेशिमबागेतून नाही तर अदानी अंबानी यांच्याकडून होईल, असे सपकाळ प्रसारमाध्यमांशी बोलताना म्हणाले. अजित पवारांचा पक्ष हा आता केवळ गुंडांचा आणि माफियांना आश्रय देणारा पक्ष उरला आहे. मराठवाडय़ातील गुन्हेगारी साम्राज्यातील नेत्यांना आणि कोयता गँगशी संबंधित लोकांना त्यांनी पक्षात स्थान दिले आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सातारा जिह्यातील भावाच्या शेतातील ड्रग्ज कंपनीचा वितरक हा अजित पवार यांच्या पक्षाचा कार्यकर्ता असल्याचे दिसून आले, असे सपकाळ म्हणाले. 2026 हे वर्ष काँग्रेससाठी पूर्णपणे ’संघटनात्मक वर्ष’ असेल. डिसेंबरपासूनच आम्ही याची तयारी सुरू केली आहे. सध्या पक्षात मोठय़ा प्रमाणावर पक्ष प्रवेश होत असून कार्यकर्त्यांचे मनोधैर्य उंचावलेले आहे. नवीन वर्षात आम्ही वैचारिक मूठ बांधून अधिक ताकदीने जनतेसमोर जाणार आहोत, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.






























































